कोल्हापूर : पिस्टल प्रकरणातील संशयितास शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी कणकवलीतून पाठलाग करून पकडले. समीर सलीम मेस्त्री (वय २०) असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयाने सोमवार (दि. १८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.
शाहूपुरी पोलिसांनी अनिल बाबूराव तावडे (रा. सरवडे, ता. राधानगरी) याला पिस्टलसह १२ जानेवारीस अटक केली होती. त्याने हे पिस्टल कणकवलीतून आणल्याचे सांगितले होते. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी चौकशी केली असता पिस्टल ज्याच्याकडून घेतले, त्या संशयितांचे नाव पत्ता समजला. त्यानुसार त्यांनी शाहूपुरी पोलिसांचे पथक शुक्रवारी कणकवलीजवळील कळमट येथे पाठविले. तेथे त्याच्या घराच्या शोध घेऊन पाळत ठेवली असता तो बाजारपेठेतून दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याची चाहूल लागताच पथकातील पोलीस हेडकाॅन्स्टेबल सुहास पोवार, प्रशांत घोलप, दिग्विजय चौगुले यांनी थरारक पाठलाग करीत त्याला अटक केली. त्याला कणकवली पोलीस ठाण्यात नेऊन तेथील पोलीस ठाण्यात संशयिताला या पिस्टल प्रकरणात ताब्यात घेतल्याची कल्पना दिली. त्यानेच हे पिस्टल संशयित तावडे यास दिल्याचे चौकशीत पुढे आले आहे.