कोल्हापूर : पुण्यात नोकरीस असणाऱ्या कागल तालुक्यातील एका तरुणीचा कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. तेथे तिच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद झाली असून, तिच्या संशयास्पद मृत्यूची मुरगुड पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. संबंधित तरुणी दोन महिन्यांची गर्भवती होती, उपचारास दाखल करून तिच्या पुण्यातील पती व नणंदेने तिला तेथेच सोडून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली व सीपीआर रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी की, कागल तालुक्यातील २५ वर्षीय तरुणी ही पुण्यात नोकरीस होती. ती दोन महिन्यांची गर्भवती होती, पुण्यातील तिच्या पती व नणंदेने तिला औषधोपचारासाठी निपाणी (कर्नाटक) येथील एका रुग्णालयात दाखल केले होते. उपचार करताना अतिरक्तस्त्रावामुळे तिची प्रकृती अत्यावस्थ बनली, त्यांनी तिला तातडीने गुरुवारी सायंकाळी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी दुपारी अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला; पण तिचा पती व नणंद तिला सीपीआर रुग्णालयातच सोडून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा परिस्थितीत नातेवाईक नसल्याने पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले नाही. शनिवारी पोलिसांनी तिच्या कागल तालुक्यातील आई-वडिलांचा शोध घेतला. सायंकाळी आई-वडील आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला.
दरम्यान, डॉक्टरांनी अनैसर्गिक मृत्यू झाल्याचा दाखला दिल्याने मरगुड पोलीस कोल्हापुरात येऊन त्यांनी आई-वडिलांचा जबाब नोंदवून पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यूची नोंद केली. याप्रकरणी कोल्हापुरात आणून सोडलेल्या तिच्या पती, नणंदेची चौकशी करण्यात येणार असल्याचे मुरगुड पोलिसांनी सांगितले.