कोल्हापूर : परीविक्षाधीन असूनही खात्यांतर्गत परीक्षा हा हा म्हणता सहज उत्तीर्ण होणारा व आॅटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये संशोधन करणारा अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत शिंदे यांना दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने काल, मंगळवारी अटक केली. प्रादेशिक परिवहन कार्यालयात तसे या अधिकाऱ्यास ‘अत्यंत हुशार’ म्हणून समजले जात होते. पण त्यांना ‘अतिहुशारी’च नडल्याची चर्चा बुधवारी दिवसभर ‘आरटीओ’ त होती. शिंदे यांना यापूर्वी सबुरीने घेण्याचा सल्ला वरिष्ठांनी अनेक बैठकीत देण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, आॅटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये किडा समजल्या जाणाऱ्या शिंदे यांनी हा सल्ला कधी मानलाच नाही. हुशार असल्याने खात्यांतर्गत परीक्षा सहज पास होणारा अधिकारी असल्याने वरिष्ठही त्यांचे कौतुक करीत असत. मात्र, नावलौकिकाबरोबरच त्यांची कार्यपद्धतीही संशयाच्या भोवऱ्यात सापडणारी होती. कारण कनिष्ठ असूनही या अधिकाऱ्यास चंदगडसारखा चेकपोस्ट नाका दिला होता. येथे खरे तर मोटार वाहन निरीक्षकाची नेमणूक केली जाते. मात्र, येथील मोटार वाहन निरीक्षकांची बदली झाल्याने सहायक मोटार वाहन निरीक्षक असणाऱ्या शिंदे यांची वर्णी लागली. मग काय, या अधिकाऱ्याचे फावले नाही तर नवलच म्हणावे लागेल! प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे १५ मोटार वाहन, तर १६ सहायक मोटार वाहन निरीक्षक कार्यरत आहेत. मात्र, वरिष्ठ असणाऱ्या मोटार वाहन निरीक्षकांना डावलून शिंदे यांच्यासारख्या कनिष्ठ व परीविक्षाधीन अधिकाऱ्याची नेमणूक महत्त्वाच्या तपासणी नाक्यावर कशी झाली, अशी चर्चाही प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांत दबक्या आवाजात होत आहे. (प्रतिनिधी)गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडलीप्रशांत शिंदे हे सांगली येथील प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून नोकरीस होते. त्यांनी एम. ई. चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचबरोबर पीएच.डी.चे संशोधनही सुरू केले होते. मात्र, ही गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून त्यांनी २०१३ साली सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत वरचा क्रमांक मिळविला. गुणक्रमवारीत अव्वल आल्याने शिंदे यांची नेमणूक कोल्हापुरात प्रादेशिक परिवहन कार्यालयात परीविक्षाधीन सहायक मोटार वाहन निरीक्षक म्हणून झाली. मात्र, कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक ! हुशारी कामात दाखविण्याऐवजी त्यांनी सेटिंगमध्येच जास्त दाखविल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होती. विशेष म्हणजे अधिव्याख्याता असताना मोठा पगार होता; पण ‘आरटीओ’त हा पगार काही हजारांत आला. तरीही त्यांनी ही नोकरी कशी स्वीकारली, हा प्रश्न अनेकांना पडला होता. सल्लाही धुडकावलाअधिकाऱ्यांच्या महिन्याच्या बैठकीत वरिष्ठांनी ‘जरा सबुरीने घ्या,’ असा सल्ला शिंदे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना दिला होता. या सबुरीच्या सल्ल्याची चर्चा शिंदे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर बुधवारी ‘आरटीओ’तील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती.
हुशार प्रशांत शिंदेंची ‘अतिहुशारी’च नडली !
By admin | Published: April 29, 2015 11:45 PM