कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील मोबाईल व गांजा प्रकरणाच्या तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली आहेत. दरम्यान, मोबाईल व गांजाची पाकिटे कारागृहात फेकलेल्या संशयितांचे चारचाकी वाहन हे मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास किणी टोल नाक्यावरुन पुढे पुण्याच्या दिशेने गेल्याचे नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आले. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कळंबा कारागृहात गंभीर गुन्ह्यातील कैदी असताना तेथे मोबाईल, पेनड्राईव्ह, चार्जर आदी साहित्य कैद्यांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रकरणाची कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची युध्दपातळीवर चौकशी करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, कारागृहात गांजा व मोबाईल फेकणाऱ्या संशयितांच्या वाहनाच्या मागावर पोलीस आहेत. जुना राजवाडा पोलिसांनी किणी व कोगनोळी टोल नाक्यावरील मंगळवारी पहाटेपासूनचे वाहनांचे २७ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये संशयितांचे चारचाकी वाहन हे किणी टोल नाक्यावरुन मंगळवारी पहाटे तीन वाजता पुण्याच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. हे फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे.
दुसऱ्या घटनेतील मोबाईलबाबतही कसून चौकशी
मोबाईल व गांजा प्रकरण ताजे असतानाच कारागृह अधीक्षकपदाचा पदभार घेतल्यानंतर काही वेळातच चंद्रमणी इंदूरकर यांनाही बराक झडतीत अतिसुरक्षा विभागाजवळ पिशवीत आणखी एक मोबाईल व चार्जर सापडला. त्याही मोबाईलचा वापर कधीपासून सुरु आहे, त्याचे सीमकार्ड कोठे आहे, याचा शोध सुरु आहे. या मोबाईलच्या दोन्हीही घटनांची चौकशी जुना राजवाडा पोलीस करत आहेत. या प्रकरणात कारागृहातील रक्षकांचा किती सहभाग आहे, याचीही कसून चौकशी पोलीस करत आहेत.
पुण्यातील टोळीचा संशय
यापूर्वी कारागृहात चेंडू टाकून गांजा पुरवणाऱ्या पुण्यातील टोळीचा पोलिसांनी छडा लावला होता. आता मोबाईल कारागृहात फेकून गेलेले संशयितांचे वाहन किणी टोल नाक्यावरुन पुढे गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्यामुळे या घटनेतही पुण्यातील टोळीचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, त्यादृष्टीने तपास सुरु आहे.