गारगोटी : भुदरगड पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागात झालेल्या भ्रष्टाचारातील संशयित दोषी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ, प्रकल्प अधिकारी नयना इंगोले व पर्यवेक्षिका रूपाली भोसले यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार यांच्या नेतृत्वाखाली भुदरगड गटविकास अधिकारी एस. जे. पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, पंचायत समितीच्या भुदरगड एकात्मिक बाल विकास कार्यालयातील बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांनी संगनमताने अंगणवाडी सेविकांचे मानधन, सार्वजनिक सुट्ट्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण, बैठका कागदोपत्री दाखवून अंगणवाडी सेविकांच्यासाठी आलेला प्रवास भत्ता बोगस बिले दाखवून कित्येक लाख रुपये खिशात घातले आहेत. किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षणाचे मानधन हडप केल्याचे उघडकीस आणल्यानंतर काही आठवड्यांपूर्वी संबंधित मुलींचे पैसे एका खासगी संगणक केंद्रात वाटण्याचा पराक्रम या अधिकाऱ्यांनी केला आहे. या कार्यालयातून माहिती अधिकारातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार कागदोपत्री निदर्शनास येत आहे. हा भ्रष्टाचार तत्कालीन पर्यवेक्षिका रूपाली भोसले आणि प्रकल्प अधिकारी नयना इंगोले यांच्या माध्यमातून झालेला आहे हे माहिती अधिकारातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे भ्रष्टाचार होत असताना जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी या महिला अधिकाऱ्यांच्या कामकाजाकडे स्वतःची जबाबदारी असतानासुद्धा पूर्णपणे कानाडोळा केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी रसाळ, प्रकल्प अधिकारी नयना इंगोले व पर्यवेक्षिका रूपाली भोसले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, महिला तालुकाध्यक्ष विद्या कदम, पं. स. सदस्य संग्राम देसाई, उपसरपंच स्नेहल कोटकर, शहराध्यक्ष शरद मोरे, स्मिताराणी गुरव, जयवंत गोरे, सविता गुरव, अस्मिता कांबळे, विजय आबिटकर, अजित देसाई, पी. एस. कांबळे, आदींच्या सह्या आहेत.
फोटो: १५ भुदरगड निवेदन
ओळ : गारगोटी : भुदरगड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना निवेदन देताना विश्वनाथ कुंभार, विद्या कदम, संग्राम देसाई, स्नेहल कोटकर, आदी.