चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील एमआयडीसीतील ‘एव्हीएच’ केमिकल कंपनीला उत्पादन थांबविण्याचा आणि प्रकल्पाला यापूर्वी दिलेल्या परवानगीची पुनर्तपासणी व जनसुनावणी घेण्यासंबंधी तातडीने अंमलबजावणी करा, असा आदेश राज्यस्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणाच्या प्रधान सचिवांना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी दिला. जागतिक वारसामध्ये समाविष्ट पश्चिम घाटातील निसर्गसंपन्न चंदगड तालुक्यात उभारण्यात आलेल्या या विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधात दोन वर्षांपासून चंदगड तालुका जनआंदोलन कृती समितीतर्फे आंदोलन सुरू आहे. तरीदेखील उत्पादनास परवानगी दिल्यामुळे दोन आठवड्यांपासून पुन्हा जनआंदोलन तीव्र केले. आंदोलनाची दखल घेऊन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनीदेखील प्रकल्पाच्या उत्पादनास स्थगिती दिली. मात्र, अवघ्या तीन तासांतच स्थगिती आदेश मागे घेतल्यामुळे कंपनीने उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे आमदार संध्यादेवी कुपेकर व डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यावरणमंत्री कदम यांची भेट घेऊन चंदगडच्या जनतेची कैफियत मांडली. त्यामुळे लोकभावना विचारात घेऊन पर्यावरणमंत्र्यांनी हा आदेश दिला. तालुक्यातील जनतेने फटाके वाजवून व साखर-पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत केले. (पान ५ वर)(आणखी वृत्त २)चंदगड तालुक्यात दिवाळी‘एव्हीएच’च्या उत्पादनाला स्थगिती दिल्याची माहिती मिळताच चंदगडसह शिनोळी, कार्वे, पाटणे व हलकर्णी फाटा, अडकूर, कानूर, कोवाड, नागनवाडी आणि कानडेवाडी येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.विनाशकारी प्रकल्पाच्या विरोधात गेली दोन वर्षे लढाई सुरू आहे. मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्र्यांनी त्याची दखल घेतली. निसर्गप्रेमी चंदगडकरांच्या आंदोलनाचे हे यश आहे. प्रदूषणकारी व विघातक असणारा हा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी सर्वप्रकारची लढाई ताकदीनिशी लढली जाईल. यापुढेही जनतेने अशीच साथ द्यावी. ‘एव्हीएच’ हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.- डॉ. नंदिनी बाभूळकर, प्रमुख जनआंदोलन कृती समिती, चंदगड.
‘एव्हीएच’च्या उत्पादनाला स्थगिती
By admin | Published: February 13, 2015 12:59 AM