सांगली : जिल्हा परिषद आरोग्यसेविका आणि औषध निर्माता पदाच्या परीक्षेचा पेपरही फुटला असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून उजेडात आली आहे. दोन्ही परीक्षांचा पेपर फोडणारी कर्मचाऱ्यांची टोळी जिल्हा परिषदेतील असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद, पंचायत समितीकडील अशा पाच कर्मचाऱ्यांना अटक झाली असल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोघांना तर सेवेतूनच बडतर्फ करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी दिली. यामध्ये आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, त्यांचा पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर त्यांच्यावरही तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.पेपर फोडणाऱ्या टोळीमधील रामदास आनंदा फुलारे (वय ४२, रा. हुबालवाडी, ता. वाळवा), शशांक श्रीकांत जाधव (२५, वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सतीश शिवाजी मोरे (३६, कवलापूर, ता. मिरज), अशोक शामराव माने (३५, कामेरी, ता. वाळवा), शिवाजी पांडुरंग गायकवाड (३३, म्हाळुंगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. हे संशयित पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागात नियुक्तीस आहेत. यातील फुलारे सध्या तरी मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यास गुरुवारी रात्री ताब्यात घेऊन अटक केली. अन्य चार संशयितांना गुरुवारी सकाळीच अटक केली होती. न्यायालयाने त्यांना २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे अटक केलेल्या पाचजणांना जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ निलंबित केले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषी सिध्द झाल्यास त्यांना सेवेतूनही बडतर्फ करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले. या प्रकरणात दहा ते बाराजणांच्या नावाची चर्चा आहे. या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर तत्काळ निलंबित करून त्यांचीही चौकशी करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेची भरतीच वादातआरोग्यसेविका, औषध निर्माता परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची छपाई जिल्हा परिषदेच्या छापखान्यात झाली होती. त्यामुळे दोन्ही प्रश्नपत्रिका फुलारे याने बाहेर काढल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित प्रश्नपत्रिकाही तेथेच छापल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेकडील सर्व नोकरभरतीच वादात सापडली आहे. कंत्राटी ग्रामसेवक परीक्षेचाही पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पेपरफुटीतील पाचजण निलंबित
By admin | Published: December 25, 2015 11:39 PM