कोल्हापूर : माले (ता. पन्हाळा) येथील भैरवनाथ विकास संस्था सभासदांच्या नावावर बोगस जिंदगी पत्रक करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केलेले जिल्हा बॅँकेचे निलंबित निरीक्षक भरत घाटगे यांना कामावर घेऊ नका, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. राजकीय हस्तक्षेप करून कोणी तरी सांगते म्हणून कामावर घेणार असाल तर तुमच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला. माले गावातील चारशे ते पाचशे शेतकऱ्यांनी सोमवारी बॅँकेत येऊन याबाबतचे निवेदन दिले. घाटगे हे जिल्हा बॅँकेच्या वारणानगर शाखेत २०११ ते २०१४ या काळात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना भैरवनाथ विकास संस्थेच्या सभासदांच्या नावावर परस्पर बोगस जिंदगी पत्रक व कर्ज मंजुरी पत्रक तयार करून कोट्यवधींचा गैरव्यवहार केला आहे. तसेच गाय व म्हैस प्रकरणात सभासदांच्या नावे बोगस प्रकरणे केली होती. ज्याच्या नावावर एक गुंठाही जमीन नसताना खोटी जिंदगी दाखवून कर्ज मंजुरी घेतलेली आहे. त्यांचा कारनामा लक्षात आल्यानंतर जिल्हा बॅँकेने त्यांना निलंबित केले होते; पण आता काही मंडळी त्यांना कामावर घेण्याबाबत प्रयत्न करत असल्याचे वारणा बॅँकेचे संचालक वसंतराव सोळसे यांनी निदर्शनास आणून दिले. घाटगेंना कामावर घेण्यासाठी विनय कोरे व विजयसिंह जाधव आग्रही असल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले. यावर संतप्त शेतकऱ्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांना फसवले, देशोधडीला लावले, त्यांना पाठीशी घालणार असाल तर चालणार नाही. वसुलीसाठी मात्र आमच्या दारात येऊ नका, असा टोला रघुनाथ चौगले यांनी हाणला. विनय कोरे व तुम्ही एकत्रित बसून विषय संपवा, असे सांगत हसन मुश्रीफ यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी काकासाहेब सोळसे, सुभाष जमदाडे, नामदेव चौगले, आक्काताई चौगले, सुमन सोळसे, अंजना सोळसे, आदी उपस्थित होते. कोरे यांच्याशी फोनवरून चर्चा हसन मुश्रीफ यांनी फोनवरून विनय कोरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर वसंतराव सोळसे यांनीही चर्चा करत घाटगेंना कामावर घेऊ नका. वर्षभर चाललेलं प्रकरण तुम्ही दोघांना बोलावून मिटवायला हवे होते. या प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत घाटगेंना कामावर घेऊ नका, असा सोळसे यांनी आग्रह धरला.मुश्रीफांना प्रसारमाध्यमांची अॅलर्जीचार-पाचशे शेतकरी जिल्हा बॅँकेत आल्याने प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तिथे पोहोचले. हे लक्षात आल्यानंतर तुम्ही मीडियावाल्यांना घेऊन आला नसता तर आताच प्रश्न सोडविला असता, असे सुनावत हसन मुश्रीफ शेतकऱ्यांवर चांगलेच भडकले.पाच पैसे न घेता ठराव देतोय!घाटगेंच्या कर्तृत्वाने ‘भैरवनाथ’ संस्था दोन कोटी ४७ लाखाने थकबाकीत गेली. त्याच व्यक्तीला विनय कोरे कामावर घेत असतील तर काय करायचे? त्यांच्याकडून पाच पैसे न घेता ठराव देतो. त्यांनी संस्था व घाटगेंना एकत्र घेऊन प्रकरण मिटविणे अपेक्षित होते, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
निलंबित निरीक्षक कामावर नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2016 12:54 AM