चंदगड : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे हलकर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये गट नं. ५२ मध्ये सुरू असलेला एव्हीएच प्रकल्प आरोग्यास घातक असल्याने या प्रकल्पातून उत्पादन करणे अथवा कच्चा माल आणून त्याची वाहतूक करण्यास किंवा साठा करण्यास प्रांताधिकारी कुणाल खेमणार यांनी १२ फेब्रुवारीपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १३९ प्रमाणे बंदी आदेश दिला आहे.चंदगड येथे पंचायत समितीच्या पारगड सभागृहात आमदार संध्यादेवी कुपेकर, एव्हीएचविरोधी कृती समिती व एमआयडीसी अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी खेमणार यांनी हा बंदी आदेश एव्हीएच कंपनीला लागू केला. या बैठकीत एमआयडीसीचे अधिकारी अनुपस्थित होते. तहसील कार्यालयाबाहेर आंदोलकांनी एव्हीएच विरोधी घोषणा देऊन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला.यावेळी डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी ज्याठिकाणी एव्हीएच प्रकल्प उभा राहिला आहे, त्या परिसरात दोन राखीव जंगले, २४ लघू पाटबंधारे तलाव, आठ कि. मी. परिसरात तीन नद्या आहेत. तसेच पश्चिम घाटातील हा संवेदनशील भाग असून, पर्यावरण खात्याने डोळेझाक केल्याने कंपनीने पर्यावरणाचे नियम बदलून आपल्यासारखे केले आहेत. त्यामुळे केंद्रीय समितीकडून या प्रकल्पाची पाहणी करून हा प्रकल्प ‘ए’ ग्रेडमध्ये घ्यावा. तोपर्यंत कंपनीच्या उत्पादनास स्थगिती द्या, अशी मागणी केली.जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांनी एव्हीएच कंपनीचे टँकर ग्रामपंचायत हद्दीतून सोडणार नसल्याचे सांगितले, तर अॅड. संतोष मळवीकर यांनी यावेळी कठोर भूमिका घेत उत्पादनावर बंदी आणण्याची मागणी केली. यावेळी प्रा. एन. एस. पाटील, एम. जे. पाटील, रामराजे कुपेकर, तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, जिल्हा परिषद सदस्य तात्यासाहेब देसाई, सुजाता पाटील, नंदिनी पाटील, तानाजी गडकरी, विष्णू गावडे, गणेश फाटक, उपप्रादेशिक अधिकारी मनीष हावळ, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)माजी आमदार नरसिंगराव पाटील म्हणाले, या औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना उद्योगधंद्यासाठी १-१ गुंठा जागेची मागणी केली होती. मात्र, एमआयडीसीने दिली नाही; पण या कंपनीला एकदम ८५ एकर जमीन कशी दिली याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
‘एव्हीएच’ला १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती
By admin | Published: February 06, 2015 12:28 AM