कोल्हापूर : दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथे एका अठरावर्षीय तरुणीच्या मृत्यूनंतर तिचा अंत्यसंस्कार व रक्षाविसर्जन घाईत उरकल्याने तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबीयांनी तिचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले, तरीही तिची आत्महत्या की घातपात, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. अस्मिता ऊर्फ रिया मारुती माने असे मृत तरुणीचे नाव आहे. घटनेमुळे दऱ्याचे वडगाव पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दर्याचे वडगाव येथील अस्मिता ऊर्फ रिया माने ही महाविद्यालयीन तरुणी कोल्हापुरात शाहू मैदान परिसरात बारावीच्या खासगी शिकवणीसाठी जात होती. रविवारी रात्री तिचा अकस्मात मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांनी पोलीस पाटील रमेश माळी, सरपंच अनिल मुळीक अशा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. सोमवारी सकाळीही परस्पर रक्षा विसर्जनही उरकले. घाईतच विधी उरकल्याने तिच्या मृत्यूबाबत दर्याचे वडगाव परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. तिने आत्महत्या केली की तिचा घातपात केला, याची चर्चा पंचक्रोशीत सुरू होती.
घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी, इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली.
पोलिसांकडून कसून चौकशी
मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेल्या दऱ्याचे वडगाव येथील स्मशानभूमीत पोलिसांनी जाऊन पाहणी केली. तिच्या आई-वडिलांसह कुटुंबाकडे चौकशी केली. त्यांनी, रविवारी सायंकाळी तिला चक्कर आली, कोल्हापूरला रुग्णालयात नेतानाच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. गावात हरिनाम सप्ताह सुरू आहे. आज, मंगळवारी एकादशी व उद्या, महाप्रसाद असल्याने लोकांना अडचण नको म्हणून अंत्यसंस्कार व रक्षा विसर्जन उरकल्याचे पोलिसांना सांगितले.
घरातून औषधी, वस्तू ताब्यात
पोलिसांनी माने कुटुंबीयांच्या घराची संशयावरून झडती घेतली. त्यावेळी तेथे त्यांना काही औषधी व संशयास्पद वस्तू मिळाल्या, त्या ताब्यात घेतल्या.
काही युवक संशयाच्या भोवऱ्यात
पोलिसांनी गावातील, तसेच कोल्हापूर शहरातील एकूण १२ तरुणांची चौकशी केली, त्यामध्ये काही तरुण संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तरुणीच्या मृत्यूबाबत पोलिसांना कळविणे आवश्यक होते, त्याबद्दल त्यांच्यावर कलम १७६ प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करीत आहोत. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर