बेपत्ता असलेले बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील जैन मुनी आचार्य १०८ कामकुमार नंदी महाराज स्वामी यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला आहे. शुक्रवारी रात्री त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील आश्रमातुन बेपत्ता झालेल्या जैन मुनींची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून खून केल्याची कबूली दिली आहे.
हिरेकुडी येथील आचार्य कामकुमार नंदी मुनी बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांनी तपास करून संशयित आरोपींना ताब्यात घेतले. सदर संशयित आरोपींनी मुनींचा खून करून मृतदेह फेकेल्याचे सांगितल्याने काल रात्री पोलिसांनी मृतदेहासाठी शोध कार्य राबविले. पण सदर आरोपींनी मृतदेह फेकलेल्या ठिकाणाविषयी क्षणाला वेगवेगळी माहिती देत असल्याने पोलिस शोधकार्य राबविले जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या चार पथकाकडून शोध कार्य सुरू आहे. स्वतः बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मुनीचा खून झाल्याची माहिती कळताच हिरेकुडी येथील आश्रमासमोर भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. तर चिकोडीचे डीवायएसपी बसवराज यलिगार यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवला आहे