सिंधुदुर्ग : जरी युती झाली तरी आम्हाला आता एकट्यानेच निवडणूक लढवायची आहे. शिवसेनेसारखे आम्ही लाचार नाही. त्यांच्यासारखे आम्ही कोणासमोरही गुडघे टेकणार नाही. कोकणचा विकास खुंटल्याने येत्या निवडणुकीत स्वाभीमान पक्ष विरोधकांचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही. माझा कोकण या निवडणुकीत जिंकला पाहिजे, अशी आमची भावना आहे, असे माजी खासदार नीलेश राणे यांनी सांगितले.शिवजयंती उत्सवानिमित्त किल्ल्यावर शिवप्रतिमेचे पूजन राणे हस्ते झाले. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील स्वाभीमानची आपली पहिली उमेदवारी नारायण राणे यांनी जाहीर केली. त्यानंतर युती झाली. त्यामुळे कोणत्याही युती, आघाडीसाठी न थांबता माझा कोकण जिंकला पाहिजे. यासाठी ही निवडणूक आहे. युती, आघाडीची ही निवडणूक नाही.राणेंना कोकणचा विकास महत्त्वाचा आहे जो पाच वषार्पासून रखडला आहे. येत्या निवडणुकीत येथील खासदाराला कायमचा मुंबईला पाठविण्याचा विडा कार्यकर्त्यांनी उचलला आहे. त्यानुसार विरोधकांचा कडेलोट येत्या निवडणुकीत केला जाईल. आम्ही कोणासमोरही गुडघे टेकणार नाही. एकटेच निवडणूक जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आमदार केवळ वेळ घालविण्यासाठी फिरताहेत. मतदार संघासाठीचे ठोस असे कोणतेही नियोजन त्यांच्याकडे नाही. पारंपरिक मच्छीमार, डिझेल परतावा यासारखे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत.
येत्या निवडणुकीत स्वाभीमानचे आमदार, खासदार निवडून आल्यावर मच्छीमारांसह अन्य जनतेचे प्रश्नही मार्गी लावले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.
महाराष्ट्राला द्यायला त्यांच्याकडे काहीही राहिले नाही. ज्या शिवसेनेने गेल्या पाच वर्षात भाजपचे कपडे फाडले त्यांच्याशीच त्यांनी युती करून सरड्यालाही लाजवेल अशी कृती केली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता त्यांना योग्य तो धडा शिकवेलच.