कोल्हापूर : मंत्री समितीचा निर्णय धुडकावत तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने हंंगाम सुरू केला आहे. बेकायदेशीर सुरू असलेला हंगाम सुरू केल्याबद्दल प्रतिटन पाचशे रुपये दंडाची रक्कम संचालकांकडून वसूल करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली. मंत्री समितीने डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री समितीचा निर्णय हा सहकारी व खासगी साखर कारखान्यांना बंधनकारक असतो. डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध असला तरी याबाबत मंत्री समितीला अधिकृत भूमिका जाहीर करावी लागणार आहे. यासाठी आज, बुधवारी मंत्री समितीची बैठक आहे, यामध्ये जो निर्णय होईल, तो सर्वांनाच बंधनकारक राहील; पण निर्णय होण्याआधीच हुकूमशाही पद्धतीने वारणा साखर कारखान्याने हंगाम सुरू केला आहे. तो बेकायदेशीर असून मंत्री समितीचा अपमान करणारा आहे. मंत्री समितीच्या परवानगीशिवाय कारखाना चालविल्यास गाळप होणाऱ्या प्रतिटनास पाचशे रुपये दंड आकारला जातो. हा दंड ऊस पुरवठा करणारे शेतकरी, कारखान्याचे संचालक मंडळ यांच्याकडून वसूल करून घ्यावा; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा ‘स्वाभिमानी’च्या शिष्टमंडळाने प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांना दिला. यावेळी ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, हरिश पाटील, किरण पाटील, आनंदराव शेळके, धनंजय सवदत्ती, राजाराम किरुळेकर, वैभव कांबळे, रमेश भोजकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘स्वाभिमानी’ची मागणी : प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे निवेदन
By admin | Published: October 19, 2016 12:36 AM