कोल्हापूर / जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १५वी ऊस परिषद आज, मंगळवारी जयसिंगपूर येथे होत असून, यामध्ये उसाच्या पहिल्या उचलीचा बार उडणार आहे. यंदाच्या हंगामात केवळ ‘एफआरपी’ घेणार नसून, त्यापेक्षा जास्त पहिली उचल असेल, असा प्रयत्न संघटनेचा आहे. राज्यातील सरासरी ‘एफआरपी’ व साखरेचे दर पाहता तीन हजार रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीचा ठराव या ऊस परिषदेत होण्याची शक्यता आहे. ऊस परिषदेत उचलीचा आकडा जाहीर करायचा आणि तो कारखान्यांनी ग्राह्य मानायचा, असेच गेले १४ वर्षे साखर कारखानदारीत सुरू आहे. त्यामुळे ऊस परिषदेकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या असतात. मागील वर्षी साखरेचे दर कोसळल्याने दराबाबत ‘स्वाभिमानी’ फारशी आग्रही राहिली नाही. ‘एफआरपी’ पदरात पाडून घेतानाच त्यांची दमछाक उडाली; पण यंदा परिस्थिती वेगळी आहे. एप्रिलपासून साखरेचे दर वधारल्याने यंदाच्या हंगामात ‘एफआरपी’वर थांबणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. सध्या साखरेचे दर ३५०० रुपयांपर्यंत आहेत, त्यात यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याने साखरेचे दर भडकणार आहेत. याचा अंदाज घेऊन यंदाची उचल किती मागायची, याचा अभ्यास ‘स्वाभिमानी’ने केला आहे. यंदा महाराष्ट्रात सरासरी २५०० रुपये प्रतिटन ‘एफआरपी’ होते. ही उचल कारखाने सहज देऊ शकतात; पण त्यापेक्षा पाचशे रुपये जादा शेतकऱ्यांच्या पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणूनच आजच्या ऊस परिषदेत तीन हजार रुपये पहिल्या उचलीचा बार उडण्याची शक्यता आहे. जयसिंगपुरात नगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे यंदाच्या ऊस परिषदेची जागा बदलण्यात आली आहे. झेले चित्रमंदिराजवळ मालू ग्रुपच्या मैदानावर परिषद होत आहे. सोमवारी ऊस परिषदेच्या निमित्ताने जय्यत तयारी करण्याचे काम मैदानावर सुरू होते. याठिकाणी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभर मेळावे, बैठका, रॅलीद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पहिल्यांदाच कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रूपाने परिषदेत मंत्र्याची उपस्थिती असणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते कोणता हल्लाबोल करतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे या ऊस परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘स्वाभिमानी’ची तीन हजारांची मागणी!
By admin | Published: October 25, 2016 12:37 AM