म्हाकवे : शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या प्रतिनिधींची गरज आहे. विधानसभेत आपल्या हक्काचा प्रतिनिधी हवा. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मागे न राहता कागलविधानसभा लढविण्यासाठी सज्ज व्हावे. यासाठी संपूर्ण ताकद आपल्या उमेदवाराच्या पाठीशी लावू, असा विश्वास शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.गोरंबे (ता. कागल) येथील कागल तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सोयाबीन पीक तालुक्यात प्रथम क्रमांक आलेल्या सुधीर पाटील (म्हाकवे) यांचा शेट्टी यांच्या हस्ते सत्कार झाला. तानाजी मगदूम, अविनाश मगदूम, संभाजी यादव, नामदेव भराडे यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी तानाजी चौगुले, सुभाष खोंद्रे (एकोंडी), मारुती मगदूम, अजित पाटील (सिद्धनेर्ली) प्रमोद मगदूम, दीपक हेगडे (सांगाव), शिवाजी कासोटे, मनोज परीट (शेंडूर), सुधाकर चौगुले (म्हाकवे) उपस्थित होते. पांडुरंग अडसूळ यांनी आभार मानले.ते साखर सम्राट मागे का?कागलच्या रणांगणात अनेक जण शड्डू ठोकत असून यामध्ये काही साखर सम्राटही आहेत. मात्र, त्यांनी मागील हंगामातील जिल्हाधिकारी यांच्या समक्ष झालेल्या निर्णयानुसार ५० व १०० रुपयांचा दुसरा हप्ता अद्यापही दिलेला नाही. निवडणुकीच्या रिंगणात पुढे असताना ते ठरलेला हप्ता देण्यात मागे का? असा सवालही शेट्टी यांनी केला.
Kolhapur: कागल विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार, ‘स्वाभिमानी’ रिंगणात उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 3:14 PM