सांगली : जागतिक बाजारपेठेत साखरेला ४१०० ते ४२०० रुपये दर असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी कारखानदारांबरोबर उसाला २७०० ते २८०० रुपये दरावर फिक्सिंग करून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, सयाजी मोरे, बजरंग पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला.ते म्हणाले की, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोल्हापुरातील बैठकीत घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. चळवळीत असणारे नेते आता सत्तेत आहेत, पण त्यांना शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव आहे की नाही, याबाबत शंका आहे. ऊसदराचा प्रश्न संपूर्ण राज्याचा असताना, केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांबरोबर बैठक घेऊन दर जाहीर करण्याची पध्दत चुकीची आहे. कोल्हापूर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. जिल्ह्याचे तुकडे पाडण्याची नवीन पध्दत संघटनांच्या नेत्यांनी आणली आहे. यातून शेतकऱ्यांचे नव्हे, तर नेत्यांचे भले होणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर खासदार, आमदारकी मिळविली, त्याच शेतकऱ्यांच्या पाठीत ऊस दराबाबत खंजीर खुपसणे योग्य नाही. बैठका बंद खोलीत घेण्याचे कारणच काय? यात लपवालपवी करण्याचे कारण काय? दरवर्षी सोयीची भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालविण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी बंद करावे. त्यांचा संधिसाधूपणा शेतकऱ्यांच्या हळूहळू लक्षात येऊ लागला आहे. शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रसंगी शिवसेना जिल्हाभर आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)हवेलीसह गाड्या दाखवू!स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील एका नेत्याने भलतीच प्रगती केली आहे. पूर्वी ते केवळ आपल्या झोपडीचे छायाचित्र सर्वांना दाखवत असत. आता मात्र ते त्यांच्या हवेलीचे छायाचित्र दाखवत नाहीत. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी भाड्याच्या खोलीत राहण्याचे नाटकही केले जात आहे. परंतु, त्यांच्या हवेलीसह गाड्यांची छायाचित्रे आम्ही प्रसिध्द करणार असल्याचेही अभिजित पाटील यांनी सांगितले.
‘स्वाभिमानी’च्या नेत्यांचा शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर
By admin | Published: November 05, 2016 11:28 PM