स्वाभिमानीचा मोर्चा ठरला अभूतपूर्व
* पूरग्रस्तांच्या प्रश्नावरून राजू शेट्टी आक्रमक
* राज्यभरातून मिळाला मोर्चाला पाठिंबा
शिरोळ / कुरुंदवाड / नृसिंहवाडी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जलसमाधी मोर्चा नृसिंहवाडी येथे येणार असल्याने सकाळपासूनच पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती. नृसिंहवाडीला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. नृसिंहवाडी-कुरुंदवाड पुलावर कडे करून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. राज्यातील विविध भागातून संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत होते. ऊस परिषदेप्रमाणेच पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी निघालेल्या पदयात्रेलादेखील तितकाच प्रतिसाद मिळाल्याने हा मोर्चा अभूतपूर्व ठरला.
पूरग्रस्तांना २०१९ च्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळावी, शासनाने जाहीर केलेली नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळावेत या मागणीसाठी प्रयाग चिखली येथून गेले पाच दिवस सुरू असलेला पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चाला सकाळी अब्दुललाट येथून प्रारंभ झाला. हेरवाड (ता. शिरोळ) येथे दुपारचे जेवण करून नृसिंहवाडीच्या दिशेने मोर्चा आगेकूच झाला. मोर्चामध्ये हजारो शेतकरी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. गावागावात रांगोळी घालून मोर्चाचे जंगी स्वागत करण्यात येत होते. राजू शेट्टी यांचे घरोघरी महिलांनी औक्षण करत व फुलांच्या पाकळ्या डोक्यावर उधळून स्वागत करत होते.
दुपारी साडेतीन वाजता मोर्चा कुरुंदवाड शहरात आला. यावेळी ओंकार चौकात सभा झाली. त्यानंर मोर्चा नृसिंहवाडीच्या दिशेने सुरू झाला. कुरुंदवाड ते नृसिंहवाडी या रस्त्यावर दुतर्फा पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुरूंदवाड नदी घाटाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बॅरिकेटस लावून बंद करण्यात आले होते. अग्निशमन दल व रुग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आली होती.
राजू शेट्टी यांच्या विजयाच्या घोषणा देत हलगीच्या निनादात सायंकाळी पाचच्या सुमारास मोर्चा नृसिंवाडीत दाखल झाला. पूरग्रस्तांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार निर्णय न घेतल्याने स्वाभिमानीचे आंदोलन हाताळण्याचा ताण पोलीस प्रशासनावर होता. त्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत पोलिसांना रस्त्यावर उभे राहून बंदोबस्त करावा लागला.
पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानीने आक्रोश मोर्चा काढला होता. चार दिवस चाललेल्या या मोर्चात मर्यादित संख्या होती. मात्र, अखेरच्या दिवशी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे अभूतपूर्व मोर्चा झाला.
आक्रोश मोर्चाला रविवारी सकाळी अब्दुललाट येथील ग्रामदैवत कल्लेश्वर मंदिरात दर्शनाने सुरुवात झाली. लाट ते हेरवाड असा ७ किलोमीटरचा प्रवास करून हेरवाड येथे दुपारच्या भोजनासाठी दाखल झाला. हेरवाड येथे मोर्चा येताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत व महिलांनी औंक्षण करत शेट्टी यांचे स्वागत केले. चार वाजता कुरुंदवाड शहरात मोर्चा आला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा दिनकरराव यादव पंचगंगा पुलावरून सायंकाळी पाचच्या सुमारास नृसिंहवाडीत पोहोचला.