कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ताराराणी आघाडीसोबत यावे, या संदर्भातील चर्चा खासदार राजू शेट्टी व ताराराणी आघाडीच्या संयोजकांमध्ये शनिवारी जयसिंगपूर येथे झाली. चर्चा सकारात्मक झाली असून, आम्ही तीन जागांची मागणी केली आहे. आज, रविवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यक्षेत्र शहरात फारसे नसले तरी कदमवाडी, भोसलेवाडी, महाडिक वसाहत, फुलेवाडी, आदी ग्रामीण वस्ती असलेल्या भागात संघटनेला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. लोकसभा निवडणुकीतही भाजपने पुढाकार घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना व रिपब्लिकन पक्षाला एकत्र करून महायुती केली होती. तसाच प्रयत्न महापालिकेच्या निवडणुकीतही भाजप व ताराराणी आघाडीचा आहे. त्याच घडामोडीचा भाग म्हणून शनिवारी ताराराणी आघाडीचे संयोजक सुहास लटोरे, सुनील कदम, आदींनी जयसिंगपूर येथे जाऊन खासदार राजू शेट्टी, भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील, सावकार मादनाईक यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीत सामील होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. किती जागा लढवायच्या या संदर्भात चर्चा अपूर्ण असून आज, रविवारी यावर तोडगा निघण्याची शक्याता आहे.
स्वाभिमानी संघटना ‘ताराराणी’सोबत
By admin | Published: August 09, 2015 1:45 AM