कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील जागांबाबतच तडजोड न झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय शनिवारी अधिकृतपणे जाहीर केला. हा निर्णय जाहीर करून संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातून प्रचाराचे रणशिंगही फुंकले. शिरोळ तालुक्यातील सात जागांवरच स्वाभिमानी व भाजपमध्ये मतैक्य न झाल्याने ही युती होऊ शकली नाही. आता त्याबाबत पुन्हा चर्चा व बैठका न घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.स्वाभिमानी संघटना स्वबळावरच लढणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’नेच सर्वप्रथम दिले होते; कारण भाजपने त्या पक्षाशी आघाडी करण्यासाठी चर्चाच केलेली नव्हती; परंतु जिल्हा परिषदेत सत्ता आणावयाची झाल्यास संघटना बाजूला जाऊन चालणार नाही, असे वाटल्यावर मग संघटनेशी बोलणी सुरू झाली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व खासदार शेट्टी यांच्यात शुक्रवारी (दि. ३) मॅरेथॉन चर्चा झाली; परंतु त्यातून तोडगा न निघाल्याने संघटनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.संघटनेने जिल्हा परिषदेच्या २२ व पंचायत समितीच्या ४४ जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यातील निम्मे उमेदवार जाहीर केले आहेत. आज, रविवारी उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.हा दांभिकपणा कशाला?बैठकीत पालकमंत्र्यांनी संघटनेपुढे मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवल्यावर खासदार शेट्टी यांनी त्यास कडाडून विरोध केला. हा दांभिकपणा आम्हाला जमणार नाही. लढायचे असेल आघाडी करून, नाहीतर स्वतंत्रपणे, असा पवित्रा त्यांनी घेतल्यावर चर्चाच थांबली. विठ्ठलराव नाईक-निंबाळकर हे फार जुने कार्यकर्ते आहेत; अशोकराव माने हे सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत, असे पालकमंत्री सांगत होते. त्यास ‘त्यांना तुम्ही पक्षात घेताना आम्हाला विचारून घेतले होते का?’ अशी विचारणा शेट्टी यांनी केली. ‘तुम्ही आयात केलेल्या माणसांसाठी आम्ही संघटनेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,’ असे शेट्टी यांनी सांगितले. संघटनेने कुणाशीच आघाडी करू नये असा कार्यकर्त्यांचा दबाव होता. कार्यकर्ता हीच माझी संपत्ती व ताकद आहे. त्यांच्या आग्रहाखातर स्वबळावर लढण्याचा निर्णय नाइलाजाने घ्यावा लागला. - खासदार राजू शेट्टी, संस्थापक-अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात जागा आहेत. हा तालुका संघटनेचा बालेकिल्ला आहे. आताही त्यांच्याकडे त्यातील आठपैकी पाच जागा आहेत व दत्तवाडमधून आदिनाथ हेमगिरे हे ४१ मतांनी पराभूत झाले होते. मात्र, भाजपने तिथे संघटनेला तीनच जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. २ नांदणीत राजवर्धन निंबाळकर व आलास मतदारसंघातून उल्फतबी मकानदारांना भाजपने आश्वासन दिल्याने तिथे भाजपला मैत्रीपूर्ण निवडणूक हवी होती व शिरोळला अशोकराव माने व अब्दुललाटमधून विजय भोजे यांच्यासाठी हे मतदारसंघ भाजपला हवे होते. ३ दानोळी, दत्तवाड व उदगाव येथे भाजप हा शिवसेनेशी छुपी युती करून आपल्याला अडचणीत आणण्याची खेळी करीत असल्याचा स्वाभिमानीला संशय होता. संघटनेशी युती तुटल्यावर लगेचच शनिवारी भाजप व शिवसेनेची युती झाली, हा त्याचा पुरावाच असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे तीन जागांसाठी भाजपशी आघाडी करण्याची गरजच काय, असा विचार करून संघटनेने वेगळी वाट शोधली.
‘स्वाभिमानी’ संघटना स्वबळावर लढणार
By admin | Published: February 05, 2017 12:15 AM