कोल्हापूर : उसाची पहिली उचल एकरकमी न मिळता ती आता दोन हप्त्यांत मिळणार आहे. राज्य शासनाने यासंबंधीचे धोरण काल, सोमवारी निश्चित केले. यावरुन शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. शासनाने घेतलेल्या या निर्णयाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने होळी करून निषेध नोंदविण्यात आला.कोल्हापुरात महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या निर्णयाची होळी करण्यात आली. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज, वीज बिलांची अन्यायी वसूली आणि बिलांची दुरुस्ती या मागण्यासाठी आजपासून महावितरणच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यावेळी एफआरपीसंबंधी शासनाने घेतलेल्या या निर्णयाची होळी करण्यात आली.यावेळी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात संघर्ष करू असा इशारा दिला. तसेच एफआरपीच्या तुकड्यांची जबर किंमत महाविकास आघाडी सरकारला चुकवावी लागेल असे ही ते म्हणाले.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापुढे एफआरपीचा आधारभूत उताऱ्यास (मूळ बेस) जो दर केंद्र सरकार निश्चित करते त्यातून तोडणी-ओढणी वजा जाता जी रक्कम राहील तेवढी पहिली उचल देण्यात यावी, असे धोरण राज्य शासनाने सोमवारी निश्चित केले. त्यामुळे यापुढे उसाची पहिली उचल एकरकमी न मिळता ती दोन हप्त्यांत मिळणार यावर शिक्कामोर्तब झाले.
FRP Price : 'स्वाभिमानी'ने केली शासन आदेशाची होळी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 7:49 PM