कुरुंदवाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जलसमाधी मोर्चा आज रविवारी नृसिंहवाडीत दाखल होणार असून, संघटनेचे नेते राजू शेट्टी व संघटनेच्या एकाही कार्यकर्त्याला नृसिंहवाडीत अथवा नदीक्षेत्र परिसरात प्रवेश करता येऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चारशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नृसिंवाडीत प्रवेश करणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.
पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली प्रयाग चिखली येथून गेल्या चार दिवसांपासून जलसमाधी परिक्रमा सुरू आहे. पूरग्रस्तांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ घोषणा केली असून, त्याचा शासकीय आदेश काढावा अन्यथा कोणत्याही परिस्थितीत हजारो शेतकऱ्यांसह कृष्णा नदीत जलसमाधी घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. शिवाय जलसमाधी आंदोलनात कार्यकर्त्यांसह शेतकरी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आहे.
हेरवाड (ता. शिरोळ) येथून जलसमाधीसाठी कुरुंदवाडमार्गे नृसिंहवाडी येथील कृष्णा नदीच्या दिशेने आंदोलक जाणार आहेत. मात्र, मार्गावर पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. जलपरिक्रमा मोर्चा अडवण्यासाठी कुरुंदवाड येथे शिवतीर्थ रस्त्यावरच बॅरिकेड्स लावण्यात येणार आहे.
तसेच शिरोळ रस्ता, शिरटी जुना रस्ता, औरवाड या मार्गावर बॅरिकेड्स लावून रस्ता पूर्ण बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आले आहेत.