जयसिंगपूर : शहरातील कोल्हापूर रोड ते स्टेशनपर्यंत मार्गाचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसल्याच्या कारणातून संतप्त नागरिकांनी काम बंद पाडले. यावेळी नागरिकांनी ठेकेदार व अभियंता या दोघांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. अंदाजपत्रकाप्रमाणे रस्ता उकरून मुरूम टाकले जात नसल्यामुळे स्वाभिमानीचे सागर मादनाईक यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोपर्यंत पालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून याचा खुलासा होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला.
यावेळी मादनाईक म्हणाले, शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सुरू असलेल्या काम कौतुकास्पद आहे. मात्र ठेकेदार कंपनीला ज्या पद्धतीने नगरपालिकेने काम ठरवून दिले आहे त्याच पद्धतीने काम सुरू नसून या कामात ठेकेदार पालिकेची पूर्णपणे फसवणूक करीत आहे. म्हणून या कामाला विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदार दीड ते दोन फुटांवरून उकरत आहे. याचा जाब अभियंता महेश पातळे यांना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी विचारले असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने काम बंद पाडण्यात आले. यावेळी अमित मगदूम, प्रशांत मादनाईक, प्रवीण पाटील, रोहित हेरलेकर, सौरभ मगदूम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो - १००६२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील रस्त्याचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसल्याच्या कारणातून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले.