लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्हा परिषदेच्या सत्तेत ते कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. सध्या ‘स्वाभिमानी’कडे महिला व बालकल्याण सभापतिपद असल्याने ते येथील सत्तेतून बाजूला होण्याची शक्यता कमी आहे. दानोळीच्या शुभांगी शिंदे यांच्याकडे हे पद आहे.
लोकसभा निवडणुकीपासून ‘स्वाभिमानी’ने भाजपला साथ देत सत्तेत सहभाग घेतला; पण शेतकरी विरोधी सरकारच्या भूमिकेमुळे सरकार मधून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या मदतीने ‘स्वाभिमानी’ला मिळालेल्या पदांचे काय होणार? संघटना याबाबत काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता लागली आहे. सध्या जिल्हा परिषदेत ‘स्वाभिमानी’चे दोन सदस्य आहेत, त्यात सभापतिपदाची जबाबदारीही आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेतून ‘स्वाभिमानी’ बाहेर पडणार का? याविषयी उत्सुकता आहे; पण राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेताना जिल्हा पातळीवरील आघाड्यांबाबत स्थानिक कार्यकर्ते निर्णय घेतील, अशी संघटनेची सध्याची भूमिका आहे.
जिल्हा परिषदेशिवाय कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत संघटनेचा एक ‘स्वीकृत प्रतिनिधी’ आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन मंडळातही संघटनेला संधी दिलेली आहे. या सर्वच ठिकाणी संघटना वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मागच्या सभागृहातही स्वाभिमानी पाच वर्षे काँग्रेस सोबत सत्तेत राहिली. लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचा उमेदवारानेच संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवली तरी जिल्हा परिषदेतील सत्तेवर मात्र त्याचा कांहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे आताही तोच कित्ता गिरवला जाण्याचीच शक्यता अधिक आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजपलाही स्वाभिमानीची गरज आहेच. भविष्यात माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश यशस्वी झाला नाही आणि शेट्टी व आवाडे यांनी कांही वेगळी भूमिका घेतली तरच जिल्हा परिषदेतील सत्तेत कांही बदल होवू शकतो. तूर्त तरी तशा कोणत्याही घडामोडी नाहीत.सध्या राज्य पातळीवरील सरकार मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर काय करायचा याबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.- प्रा. जालंदर पाटील (जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष)