जयसिंगपूर : राज्यात अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी थकीत ठेवलेली आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याच साखर कारखान्याने एफआरपीची मोडतोड केली आहे. २२ मार्चच्या आत राज्यातील साखर कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी जमा करावी, अन्यथा सहकारमंत्र्यांच्या कराड येथील सह्याद्री साखर कारखान्यासमोर असलेल्या स्व. पी. डी. पाटील यांच्या पुतळ्यासमोरच बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.
यंदाच्या गळीत हंगामात तुटणाऱ्या उसाला राज्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी द्यावी, यासाठी स्वाभिमानीने आग्रही भूमिका घेतली होती. स्वाभिमानीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिलेली आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी देण्याची हमी दिली होती. मात्र काही साखर कारखान्यांनी आपला शब्द फिरविला. तीन ते चार कारखाने वगळता उर्वरित साखर कारखान्यांनी २५०० रुपयेच पहिली उचल जमा केली. तसेच सातारा जिल्ह्यासह राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची मोडतोड केली आहे. यासंदर्भात साखर आयुक्तांकडे आम्ही तक्रार दाखल केली.
राज्यातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण एफआरपी मिळवून देणे हे सहकारमंत्र्यांचे कर्तव्य आहे. सहकारमंत्रीच जर कायदे मोडत असतील तर मग शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा, सहकारमंत्र्यांना सुबुद्धी यावी, तसेच राज्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी द्यावी, यासाठी स्वाभिमानीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.