समीर देशपांडेतारीख १५ आॅगस्ट. स्वातंत्र्यदिन संपन्न झाला. त्याच दिवशी संध्याकाळी मंडळाची बैठक सुरू झाली. यंदाचा गणेशोत्सव विधायक पद्धतीने साजरा करूया, असा प्रस्ताव मंडळाच्या अध्यक्षांनी मांडला. विधायक पद्धतीने म्हणजे त्यामध्ये काय येतं आणि काय येत नाही यावर काथ्याकूट सुरू झाला; पण ज्येष्ठांचं ऐकायचं ठरलं. धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेऊन देणगी गोळा करणे, त्यासाठी पावती बुकं छापणे आणि रीतसर उत्सव संपल्यानंतर चौकामध्ये हिशेबाचा फलक लावणे, असा क्रम ठरला. जबाबदारी वाटून दिली. उगीच आपला संबंध नाही, त्या गल्लीत जाऊन वर्गणी मागायची नाही, असंही ठरलं होतं. गल्लीतील नागरिकांनी मुलं विधायक गणेशोत्सव करताहेत म्हटल्यावर कधी नव्हे ते उत्साहाने वर्गणी दिली. गल्लीतील व्यापारी, दोन ठेकेदार, इंजिनिअर आणि प्राध्यापक, शिक्षकांनीही घसघशीत वर्गणी दिली.
गणेशचतुर्थीच्या आदल्या रात्रीच मंडप सजला होता. सकाळी बरोबर आठ वाजता आवरून पारंपरिक पोशाखामध्ये ५0-६0 जण तयार होते. कधी नव्हे ते १0-२0 मुलीही आल्या होत्या. छोट्यांची धावपळ सुरू होती. एवढ्यात ढोल-ताशा पथक आले, सनई चौघडा वाजविणारे आले. ट्रॅक्टर सुरू झाला. कुंभार गल्लीत ‘मोरया’च्या गजरामध्ये मूर्ती ट्रॉलीत विराजमान झाली. हलगी, घुमक्याच्या कडकडाटात बाप्पा गल्लीत आले. औक्षण झालं. एक सोडून पाच आरत्या म्हटल्या गेल्या. नैवेद्य दाखविला. वसंतराव देशपांडे यांच्या ‘तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता’, लता मंगेशकर यांच्या ‘गजानना तू गणराया’, प्रल्हाद शिंदेंच्या ‘बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा’ इथंपासून अजय अतुलच्या ‘देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया’पर्यंतच्या गणेशगीतांनी गल्ली दुमदुमून गेली.
दुपारच्या वेळी स्पीकर बंद ठेवला. संध्याकाळी पाचनंतर गल्लीत पुन्हा लगबग सुरू झाली. रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा घेतल्या. गल्ली एकत्र आली. आरत्या झाल्या आणि मान्यवरांच्या व्याख्यानांना सुरुवात झाली. उपस्थितीही चांगली होती. अनंत चतुर्दशीपर्यंत हाच दिनक्रम राहिला. लहानांपासून, मोठ्यापर्यंत गल्लीतील प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत सहभागी झाला होता. दहा-बारा दिवस गल्लीत एक वेगळेच वातावरण होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव सुरू आहे, याची दखल वृत्तपत्रांनी घेतली. वरिष्ठ पोलिसांनी आपणहून आरतीला हजेरी लावली. अनंत चतुदर्शीदिवशी वेळेत सर्वजण तयार झाले. पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्याचे आधीच ठरले होते. मराठमोळ्या वेशामधील युवक-युवतींमुळे वातावरण भारदस्त झाले होते.
ठरलेल्या मार्गावरून आमची पालखी निघाली. महापालिकेनं रस्त्यांवरचे सर्व खड्डे बुजविले होते. इतर सर्व मंडळेही वेळकाढूपणा न करता आपले गणपती पुढे नेत होती. अतिशय सुश्राव्य अशी गाणी लागली होती. त्यामध्ये काही गीते नृत्यप्रधान होती आणि अनेकजण त्यांवर आपले नृत्यकौशल्यही दाखवत होते. विविध रंग, वेगवेगळे ध्वनी आणि अनेकपदरी जल्लोष असे विसर्जन मिरवणुकीचे स्वरूप होते. पोलीस आणि अधिकारीही मिरवणुकीचा आनंद घेताना दिसत होते.
‘महाद्वार’वर होणारी नेहमीची चेंगराचेंगरी नव्हती. कोणतंही मंडळ कुणाला खुन्नस देत नव्हतं. सर्वपक्षीयांनी महापालिकेच्याच मंडपामध्ये बसून पानसुपारी देण्याचं ठरलं. जागोजागी पिण्याचं चांगलं पाणी उपलब्ध होतं. लेझीम, मर्दानी खेळ, सनई-चौघडा, बॅँडच्या सुरांचं साम्राज्य मिरवणुकीवर दिसत होतं. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे धूप, अगरबत्ती वगळता कशाचाही वास मिरवणुकीत येत नव्हता.
विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू झाली. वेळेत संपली. कुठेही वादावादी नाही, मारामारी नाही, शरीर थरथरवणारी साऊंड सिस्टीम नाही. पोलिसांनाही यंदाचा गणेशोत्सव वेगळा वाटला. उत्सवाच्या आधी पेठापेठांमध्ये घेतलेल्या बैठकांचं सार्थक झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. विसर्जनावेळीही नदी, तलावाकाठी निर्माल्य बाहेर काढून ठेवले जात होते. मूर्तीही काहिलीमध्ये विसर्जित केल्या जात होत्या.
आपल्या जिल्ह्यातील या आदर्श गणेशोत्सवाची देशभरात दखल घेतली गेली. पर्यावरणपूरक, विधायक, समाजाविषयी बांधीलकी मानून साजरा केलेला आदर्श उत्सव म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. कोल्हापूरचं नाव देशभर उंचावलं. एवढ्यात धाडधुडुम आवाज झाला. माझे स्वप्न भंगले होते. शेजारच्या गल्लीतील मंडळाची आरती झाली होती आणि कान फाटेपर्यंत बॉम्ब फुटत होते. मी वास्तवात आलो आणि थोडा उदासही झालो; पण शाडूच्या मूर्तीचं वाढतं प्रमाण, जिल्हा परिषदेच्या निर्माल्य दान मोहिमेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद, पारंपरिक पद्धतीनं मिरवणुका काढणारी मंडळं हे सगळं पाहता हे स्वप्न सत्यात कधी ना कधी उतरेल, असा विश्वास मनामध्ये दाटला आणि पुन्हा मी देखावे पाहण्यासाठी बाहेर पडलो.