महाराष्ट्र-कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवर वसलेला चंदगड तालुका म्हणजे जणू पृथ्वीवर स्वर्गच अवतरलेला भास होतो. तिलारीनगरनजीक असलेला स्वप्नवेल पॉर्इंट म्हणजेच गरिबांचे प्रती महाबळेश्वर आहे. निसर्गवेड्या पर्यटकांना पारगड, स्वप्नवेल पॉर्इंट, रातोबा पॉर्इंट, ग्रीन व्हॅली रिसॉर्ट, सर्च पॉर्इंट, मोर्लेचा दुर्गोबा धबधबा आणि तिलारीचा तुडुंब भरलेला जलविद्युत प्रकल्प पर्यटकांना भुरळ घालतोय. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा वेगळाच आनंद चंदगड तालुक्यात पर्यटक लुटत आहेत.धो-धो पावसात चंदगड येथील संपूर्ण डोंगरमाथ्यावरील हिरवळ, अविरत कोसळणारे शुभ्रधवल पाणी पाहणाऱ्यांना निसर्ग पांढऱ्या रंगाची किनार असलेला हिरवा शालू परिधान करून जणू काही आपल्या स्वागताला उभा आहे की काय असा वाटतो. पारगडच्या पायथ्यापासून नागमोडी वळणे घेत जाताना जंगली प्राणी, निरनिराळे खेकडे, देवाच्या गायी, थुई-थुई नाचणारे मोर, हत्ती, रानडुकरे व निरनिराळे पक्षी व प्राण्यांचे दर्शन होते. चुकून एखादेवेळी झालेले सूर्यदर्शन, मध्येच येणारे धुके मनाला अल्हाददायक वाटते. येथून दिसणारा गोव्याचा अथांग महासागर डोळ्यांचे पारणे फेडतो. पारगडबरोबरच तालुक्यातील कलानंदीगड, गंधर्वगड, महिपाळगड, आदी गड पाहिल्यानंतर शिवकालीन इतिहासाची आठवण होते. स्वप्नवेल पॉर्इंट म्हणजे तर महाबळेश्वर आणि निसर्गाचा अद्वितीय खजिना येथे पाहावयास मिळतो. धुक्यांचे पांघरूण व धो-धो कोसळणारा पाऊस आणि रोरावणारा वारा, तिलारी प्रकल्पाच्या कॅनॉलच्या पुलाखालील प्रचंड उंचीवरून कोसळणारा धबधबा, भन्नाट वारा, आठवडा-आठवडा जमिनीवर राहणारं धुकं आणि फेसाळणारे शुभ्र धबधबे येथील निसर्गाचे सोबती आहेत.राधानगरीतील धबधबे खुणावताहेत पर्यटकांना राधानगरी तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने छोट्या धबधब्यांसह राऊतवाडीचा धबधबा जोराने कोसळत आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. जिल्ह्यातील हजारो पर्यटक कुटुंबासमवेत, मित्रांसमवेत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत आहेत.धरणाचा तालुका अशी राधानगरीची ओळख आहे. तालुक्यात राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी जलाशय आहेत. राऊतवाडी धबाधब्याबरोबर रामणवाडी, हसणे, सोळांकूर, गैबी दरम्यान असणाऱ्या छोट्या-छोट्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. हिरवाईने नटलेले डोंगर आणि पावसाच्या धारा अंगावर झेलण्याचा मनमुराद आनंद पर्यटक घेत आहेत. रविवारी सुटीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी अधिक होत आहे. राधानगरी ते दाजीपूर या मार्गावरील पदभ्रमंती करताना जंगली प्राण्यांचे हमखास दर्शन होते. साप, कीटक व विविध प्रकारची फुलपाखरे, दुर्मीळ, फुले, आदी पर्यटकांचे लक्ष वेधत आहेत. दाजीपूर अभयारण्यावरील कोकण पॉर्इंटवरून दिसणारे सौंदर्य, दाट धुके, ढग जमिनीवर उतरल्याचा भास होणारे दृश्य पर्यटकांना भुरळ पाडते.गगनबावड्यात डोळे दीपवणारे घाट!नैसर्गिक सौंदर्याचा खजिना पाहायचा असेल तर गगनबावड्याला चला म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे भरभरून निसर्गसौंदर्य सध्या गगनबावड्याला लाभले आहे. गगनबावडा तालुका म्हटले की, पावसाचे माहेरघर म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. पावसाळ्यात दाट धुके, त्यातच कोसळणारा टपोरा पाऊस यामुळे गगनबावडा तीन महिने एक वेगळेच रूप धारण करतो. गगनबावड्याचे हे रूप पर्यटकांना एक वेगळा आनंद देऊन जातो. येथून करूळ व भुईबावडा हे दोन घाट कोकणात मार्गक्रमण करतात. या घाटाचे सृष्टीसौंदर्य तर पावसाळ्यात भुरळ घातल्याशिवाय राहत नाहीत. हिरवीगार शाल पांघरूण लांबच लांब पसरलेल्या लहानमोठ्या टेकड्या कोकणातील जीवनाचे दर्शन घडवितात. करूळ व भुईबावडा घाटात पावसाळ्यात उगम पावणारे लहानमोठे धबधबे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची हौस भागविण्यास पुरेसे ठरतात. नागमोडी वळणे घेत जाणारे घाटरस्ते व घाटातून झुळझूळ वाहत नदीत पडणारे पाण्याचे प्रवाह पाहून पर्यटक क्षणभर थक्क होतो. येथील गगनगड न पाहिले तर नवलच. सध्या मात्र गगनबावडा एक वेगळेच वातावरण अनुभवत आहे. दाट धुके, त्यातूनच भुईबावडा घाटातून जाताना लागणारा पहिलाच धबधबा आकर्षित करून घेतो. याच ठिकाणावरून अगदी आभाळ टेकलेल्या क्षितिजापर्यंत दूरवर आपली नजर हरवून जाते. मध्येच येणारी एखादी सूर्यकिरणाची सोनेरी लकेर... अशा काहीशा वेगळ््या वातावरणातील पाऊस सध्या येथे पाहावयास मिळत आहे. या पावसाची मजा चाखण्यासाठी पर्यटक येथे येत आहेत. भिजायचं तर ‘बर्की’तच!निसर्गाची ओढ सर्वांनाच असते. पावसाळ्यात तर निसर्गसौंदर्याने नटलेली ठिकाणे गर्दीने फुलून जातात. गर्द हिरवाईचे मनमोहक रूप, ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ, मोत्यासारखे दिसणारे गवतावरील दवबिंदू, गवतातच विणलेली मोत्यांची जाळी मनाला भुरळ पाडतात. या निसर्गसौदर्यांचा आनंद लुटण्यासाठी पावसाळी सहलींचे आयोजन केले जाते. पावसात भिजल्याशिवाय या सहलींना पूर्णत्व मिळत नाही आणि यासाठीच वेगवेगळी ठिकाणे निवडली जातात. अल्पावधीत प्रसिद्धीस आलेल्या शाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधब्यात न्हाऊन निघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. बर्की पर्यटकांचे आवडते ठिकाण बनत असून, येथील धबधब्याखाली भिजणे म्हणजे स्वर्गीय अनुभव मिळणे आहे.धबधब्याकडे जाण्यासाठी गावापासून तीन किलोमीटर पुढे पायपीट करावी लागते. धबधब्याकडे जाताना हिरवे डोंगर, जलाशय, खळखळणारे ओढे, डोलणारी झाडे, फुले, पक्षी, डोंगरातून कोसळणारे प्रवाह अशी निसर्गाची उधळण अनुभवण्यास मिळते. इथल्या सुंगधी वातावरणाची भूल प्रत्येकाला मोहविते नव्हे, तर स्वर्गप्राप्तीचा आनंद देते. धबधब्याच्या मार्गावरच आता जलाशय बांधला असून, याठिकाणी महसूल व पाटबंधारे विभागाच्यावतीने बोटिंगची सोय करण्यात आली आहे. बोटिंगमुळे धबधब्याकडे जातानाची पायपीटही कमी होते. मार्गक्रमण करतानाच धबधब्यांचे लांबून होणारे दर्शन वेगळीच अनुभूती देतात. जंगलातून पायपीट करत गेल्यावर मूळ धबधब्याचे दर्शन होते. तो २० फूट रुंदीच्या पात्रातून सुमारे ४०० फुटांवरून कोसळतो. कोसळणाऱ्या या पांढऱ्याशुभ्र प्रवाहाने मन अगदी प्रसन्न होते. या धबधब्याखाली भिजण्याचा अनुभव काही औरच असतो. या कोसळणाऱ्या शुभ्र जलधारा पाहून मन प्रसन्न होते. मुख्य धबधब्याच्या आजूबाजूला आणखी चार धबधबे आहेत. येथेही पर्यटकांची गर्दी होते. पर्यटनाच्यादृष्टीने बर्की हे ठिकाण प्रसिद्ध असले, तरी या ठिकाणी विकासाच्याबाबतीत उदासीनता आहे. त्यातच येथे ग्रामपंचायत नसून, ग्रामदान मंडळ असल्यानेही मर्यादा आहेत. त्यामुळेही इथला विकास खुंटला आहे.निसर्गसौंदर्य पर्यटनस्थळ रा म ती र्थ मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या अनेक साहित्यकृतींत उल्लेख आलेल्या आजऱ्यापासून दोन कि़मी. अंतरावर असणाऱ्या रामतीर्थ या सुप्रसिद्ध ‘क’ वर्ग पर्यटनस्थळी नैसर्गिक सौंदर्याची मुक्त उधळण पाहावयास मिळते. असे असले तरीही याठिकाणी रस्ते, स्वच्छतागृहे, यात्री निवास यांसारख्या प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांची निराशा होताना दिसते.स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष असताना रामतीर्थला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्याबरोबरच परिसर विकासासाठी ४५ लाख रुपयांचा निधीही मिळवून दिला. या निधीतून थोडाफार का असेना रामतीर्थ परिसराचा चेहरा बदलण्यास मदत झाली. पर्यटकही या भागाकडे आकर्षित होऊ लागला. निधी अपुरा पडल्याने महादेव मंदिरासमोरील बांधकाम, पर्यटकांसाठी रॅम्प व किरकोळ कामे झाली. काही स्थानिक मंडळी लोकवर्गणी जमा करून इतर कामे करीत आहेत.साहजिकच याचा एकत्रित परिणाम म्हणून पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पर्यटकांमध्ये वाढ होत असली, तरीही प्राथमिक सुविधांचा अभावच आहे. रामतीर्थ फाट्यालगतच कचऱ्याचे ढीग दिसतात. फाट्यापासून राममंदिरापर्यंत असणाऱ्या रस्त्याची पूर्ण दुर्दशा झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी यामध्ये निश्चितच कमी पडत आहेत. यात्री निवासामध्ये पर्यटकांना थांबण्याची सोय करण्यात आली असली, तरी यात्री निवास बंद अवस्थेतच असल्याने अडचणीचे होत आहे. स्वच्छतागृहे वापराअभावी पडून आहेत. ग्रामपंचायतीने स्वच्छतागृहे खुली करण्याची गरज आहे.
स्वप्नवेल पॉर्इंट म्हणजे प्रती महाबळेश्वर
By admin | Published: June 29, 2015 12:13 AM