कोल्हापूर : हवामान खात्याने दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरवत शुक्रवारी दुपारनंतर वादळी पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह एंट्री केली. साडेचारच्या सुमारास बरसलेल्या जलधारांमुळे दिवसभराचा उष्मा गारव्यात परावर्तीत झाला. घामांच्या धारामुळे कासावीस झालेल्या जिवाला पावसाच्या थेंबांनी सुखाची अनुभूती दिली.
केरळ व विदर्भाच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रातील दक्षिणेतील सर्वच राज्यांत सोमवारपर्यंत जोरदार वादळी पाऊस पडेल, आभाळ ढगाळ राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून एखादी सूर्यकिरणांची तिरीप येत होती. कडक ऊन नसले तरी प्रचंड उष्मा जाणवत असल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. बाहेर फिरतानाही उष्णतेच्या झळांनी जीव कासावीस होत होता. दुपारीच पाऊस येईल असे वाटत हाेते; पण तो शहरात साडेचारच्या सुमारास दाखल झाला. सुरुवातीला थांबून थांबून येणाऱ्या पावसाने नंतर जोर धरला. विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस कोसळला.
गुरुवारीही दुपारनंतर असेच पावसाचे वातावरण होते; पण एखाद-दुसरे थेंब सोडता जोरदार पावसाने हुलकावणी दिल्याने प्रचंड उष्म्याचा सामना करावा लागत हाेता. ३८ अंश सेल्सिअसच्यावर तापमानाचा पारा गेल्याने अंगाची काहिली होत होती. शुक्रवारी मात्र पावसाने ही सगळी कसर भरून काढत ढगांच्या गडगडाटासह आगमन केले. आता पुढील तीन दिवस असेच पावसाळी वातावरण कायम राहणार आहे. त्यामुळे सकाळपासून घामाच्या धारा आणि दुपारनंतर जलधारांचा सामना करावा लागणार आहे.