इचलकरंजी : नगरपरिषदेकडील अकरा वॉर्डांमधील रस्ते व गटारी साफसफाई करणाऱ्या कामगारांच्या पगार व इतर हक्कांच्या रकमा मिळाव्यात, अशा मागणीचे निवेदन लाल बावटा जनरल कामगार युनियनने नगराध्यक्षा अलका स्वामी यांना दिले.
निवेदनात, सन २०१८-१९ मध्ये गटारी व रस्ते सफाईचे काम अकरा वॉर्डांमध्ये एका खासगी ठेकेदाराला दिले आहे. त्यामध्ये आठ ठेकेदारांना हे काम दिले होते. या ठेकेदारांनी कोणत्याही महिन्यात ठरवून दिलेली कामगारांची संख्या कामावर ठेवली नसून कमी कामगार दाखवून सफाईचे काम केले आहे. आठवड्यातून एक, तर काही भागांत दोन दिवस काम केले जाते. कामगारांचे हजेरीपत्रक पूर्ण नोंदीसह सादर केले नाहीत. कामगारांना करार काळात कधीही किमान वेतन दिले नाही तसेच कामगारांची वैद्यकीय तपासणी केली नाही. त्यामुळे कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करावी, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात शिवगोंडा खोत, दत्ता माने, भरमा कांबळे, सदा मलाबादे, सुभाष कांबळे, आदींचा समावेश होता.