दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत चालणारी गिरनारची परिक्रमा. ही परंपरा किती जुनी? तर अगदी श्रीकृष्णाच्या काळातली. इतकी प्राचीन. संगीत सौभद्राची नव्याने उजळणी केली तर यतिवेशातील अर्जुनाने सुभद्राहरण करण्यासाठी जो दुर्गम गिरीशिखरांचा प्रदेश निवडला, जी यात्रेची पर्वणी साधली ना, तीच ही परिक्रमा. गुजरातच्या कानाकोपऱ्यातले भाविक आपल्या कुटुंबकबिल्यासह या यात्रेत सामील होतातच. परंपरेने चालत आलेला त्यांचा वारसा आहे तो. त्यांच्या जोडीला आता महाराष्ट्रातून विशेष करून पुण्या-मुंबईकडच्या भक्तजनांची भर वाढतच आहे. वाचनसंस्कृती फोफावल्याचा की सोशल मीडियाचा फायदा-तोटा न कळे. भवनाथ येथील दुधेश्वर मंदिरापासून परिक्रमेला सुरुवात होते, पण गर्दीचा महापूर जुनागडपासूनच उसळलेला असतो आणि भवनाथाच्या पायथ्याशी त्याचा महासागर होतो. संपूर्ण परिक्रमेचा मार्ग हा दाट जंगलातून जातो. आम्हीही उत्साहाने आणि उत्सुकतेने सकाळी सहा वाजता परिक्रमेच्या जत्थ्यात सामील झालो. चालायला सुरुवात झाली आणि दहा-पंधरा मिनिटांतच एके ठिकाणी लांबच लांब रांग लावावी लागली. थांबून ओळखपत्र काढायला लागलो तर लक्षात आलं की, तिथं यात्रेकरूंच्या पाठपिशव्या, हातपिशव्या तपासत आहेत. त्यातले सामान, खाण्याचे जिन्नस कागदी पिशव्यात भरून परत देत आहेत. या अस्पर्श जंगलात, दऱ्याखोऱ्यात प्लास्टिक कचरा टाकू नका, सहकार्य करा, अशी कळकळीची विनंती करणारी ही मंडळी स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आहेत. विद्यार्थीपण आहेत. भल्या पहाटे, ऐन थंडीत अतिशय शांतपणे, शिस्तीत त्यांचे हे काम सुरू आहे.आपल्या कोल्हापुरातही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी ६० हजार कागदी पिशव्यांचे वाटप केल्याची बातमी आपल्या वाचनात आली होती. एकीकडे कसल्या तरी उन्मादाने, बेफिकीर, बेमूर्वत होऊन बिनधास्तपणे वावरणारी तथाकथित हौशी भाविक यात्रेकरू किंवा पर्यटकमंडळी आणि दुसरीकडे पर्यावरणाचा ढासळणारा तोल सावरू पाहणारी जागरूक मंडळी. कचरा करणाऱ्यांचे हात हजार, सावरणाऱ्यांचे अगदीच अपुरे, तोकडे हात.असाच अनुभव कर्दळीवनाच्या यात्रेतही आलेला. अक्कमहादेवीच्या नैसर्गिक गुहेत, वन्यजिवांच्या रात्रवस्तीच्या जागी हौशी भाविकांनी कब्जा केलेला. काही ‘पुण्ययात्रा’ घडविणारे ‘पुण्य क्षेत्रा’तले ठेकेदार शेकडोंच्या घरात भाविकांना घेऊन जातात. त्यांनी मागे ठेवलेल्या असंख्य प्लास्टिकखुणा त्या गुहेत विखुरलेल्या. बाटल्या, टीन, पत्रावळी, द्रोण, शाम्पू सॅचेट, प्लास्टिकची पोती आम्ही गोळा केली आणि दरीत डोकावलो तर गुहेसमोरच्या दरीतले ते रंगीबेरंगी चमकदार ढीग आमच्याकडे दात विचकून हसताहेत असेच वाटले. या अनैसर्गिक कचऱ्याची कशी विल्हेवाट लावावी ते समजेना. जाळून तरी कसा टाकणार? एखाद्-दुसरी ठिणगी बाहेर उडून गेली तर त्या नि:शब्द जंगलातल्या वणव्याचे चांगलेच फावणार!जमेल तेवढा कचरा तिथेच गाडून आम्ही पुढे निघालो. कधी शहाणे होणार? कधी सावरणार, कसे सावरणार याचा विचार करीत. - डॉ. सुप्रिया जोशी. (‘महिलांनो लिहित्या व्हा’ लेखन चळवळीतील प्रतिनिधी)‘ङ्म’’ङ्म‘ें३स्र१ं३्र२ं@िॅें्र’.ूङ्मे
सावरणारे हात !
By admin | Published: April 02, 2017 10:16 PM