कोल्हापूर : शिवजयंती दिनी मंगळवारी इचलकरंजी नवीन युवक सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर’ असा प्रतीकात्मक फलक विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरात लावला.या सेनेचे कार्यकर्ते दुपारी बाराच्या सुमारास विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. त्यांनी याठिकाणी असलेला जुन्या फलकावर ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर’ असा उल्लेख असणारा दुसरा फलक लावला. या कार्यकर्त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या.
यावेळी सेनेचे अध्यक्ष संतोष कांदेकर, योगेश चव्हाण, सुभाष वद्दी, राहुल लोणारे, गणेश नागे, आकाश यादव, विशाल आस्माणे, मनोज कोरवी, आदी उपस्थित होते. या विद्यापीठाच्या नावामध्ये सध्या छत्रपतींचा एकेरी उल्लेख होतो. ते योग्य नाही. सन्मानकारक उल्लेख व्हावा, यासाठी विद्यापीठाचा नामविस्तार ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर’ असा करावा, या मागणीसाठी आम्ही विद्यापीठ प्रशासनाला निवेदने दिली आहेत, आंदोलन केले आहे. मात्र, विद्यापीठाकडून त्यादृष्टीने काहीच कार्यवाही झाली नाही.
त्यामुळे शिवजयंती दिनी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा फलक आम्ही लावला असल्याचे नवीन युवक सेनेचे अध्यक्ष संतोष कांदेकर यांनी सांगितले. विद्यापीठाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नामविस्तार लवकरात लवकर करावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कांदेकर यांनी यावेळी दिला.