कोल्हापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस मुख्यालयाची त्र्यंबोली यात्रा साधेपणाने साजरी करण्यात आली. मुख्यालयाची पालखी परंपरा जपत पाच पावले चालून जपण्यात आली. यावेळी भाविकांच्या वतीने देवीला कोरोनाचे संकट दूर होऊ दे, असे साकडे पुजाऱ्यांनी घातले.
आषाढ महिन्यात पंचगंगा नदीला आलेले नवे पाणी त्र्यंबोली देवीला वाहिले जाते. शहरातील पेठापेठांतून वर्गणी काढून मंडळे ही यात्रा साजरी करतात. यंदा मात्र सर्वत्र कोरोनाचे संकट असल्याने सगळ्या जत्रा, यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरची रक्षकदेवता म्हणून त्र्यंबोली देवीची महती असल्याने पोलीस मुख्यालय आणि लष्कराच्या वतीनेदेखील आषाढात देवीला मानवंदना दिली जाते.त्र्यंबोली देवीच्या मंदिरातील देवीचे मुखवटे आदल्या दिवशी पोलीस मुख्यालयात येतात. येथे देवीची ओटी भरून पूजा केली जाते. यात्रेदिवशी सकाळी मुख्यालय परिसरातून वाजतगाजत पालखी मिरवणूक त्र्यंबोली टेकडीकडे जाते. यंदा ही पारंपरिक मिरवणूक रद्द करण्यात आली. सोमवारी (दि. ६) मोजक्या महिलांच्या उपस्थितीत देवीची ओटी भरण्यात आली. पालखी परंपरा खंडित होऊ नये म्हणून पूजेचा मान असलेल्या विजय व्हरांबळे यांच्या घरीच कुटुंबीयांनी देवीच्या मुखवट्यांचे पूजन करून पाच पावले चालून पालखी मिरवणूक काढली; तर शिजवलेल्या अन्नाऐवजी कोरडा शिधा नैवेद्य म्हणून देण्यात आला.त्र्यंबोली देवीचे मंदिर सध्या बंद असले तरी मंगळवारी टेकडीवर काही प्रमाणात गर्दी होती. भाविकांनी प्रवेशद्वाराबाहेरच पाणी वाहून कळसाला नमस्कार केला. ज्या भाविकांना देवीला नैवेद्यच द्यायचा असेल, अभिषेक असेल त्यांनी आदल्या दिवशी पुजाऱ्यांकडे शिधा द्यावा. त्यांच्या वतीने पूजन केले जाईल. कोरोनाचे संकट दूर होऊ दे म्हणून लॉकडाऊनपासून मंदिरात होमहवन व यज्ञ केले जात असल्याची माहिती प्रदीप गुरव यांनी दिली. आता दोन शुक्रवार आणि एक मंगळवार या यात्रेसाठी मिळणार आहेत.