कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूचा महापूर वाहण्याची दाट शक्यता आहे. छुप्या मार्गाने दारू आणण्यासाठी उमेदवारांच्या पंटरांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे; परंतु हा महापूर रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांच्या सीमांवर (बॉर्डर) करडी नजर ठेवत ३५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची यंत्रणा सज्ज ठेवली आहे, अशी माहिती विभागीय उपायुक्त यशवंत पोवार यांनी दिली.विधानसभेचे वारे तापू लागले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात दारूची मोठ्या प्रमाणात उलाढाल होऊ लागली आहे. गोव्याहून विदेशी दारू छुप्या मार्गाने वाहतूक करून उमेदवारांच्या पंटरांनी गल्लीबोळांत, गावागावांत दारूचे बॉक्स पोहोच करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
ग्रामीण भागातील गटा-तटांच्या राजकारणामुळे ठिकठिकाणी तणाव निर्माण होत आहेत. त्यातच कार्यकर्ते दारू पिऊन वावरत असल्याने वादावादीचे प्रसंग घडत असतात. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी झाली होती.
विधानसभा निवडणूक चुरशीची होत असल्याने दारूचा महापूर मोठ्या प्रमाणात वाहण्याची शक्यता असल्याने ती रोखण्याचे मोठे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर आहे. गोव्याहून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होण्याची शक्यता असल्याने तिलारी, गगनबावडा, दाजीपूर, हिरणी, आजरा हे पाच तपासणी नाके सील केले आहेत.
*वाहनांची कसून तपासणी*गोव्याहून येणाऱ्या चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवरून विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. गोव्यामध्ये दारूचे दर कमी असल्याने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांतील पंटरांचा या ठिकाणांहून ट्रक भरून मद्यसाठा आणण्याचा इरादा आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाकडून वाहनांची, विशेषत: प्रवासी एस. टी. बस, ट्रॅव्हल्स गाड्या व खासगी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.