लोकमत न्यूज नेटवर्क
बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील पडसाळी हे गाव पश्चिम पन्हाळ्याच्या शेवटच्या टोकाला व कोकणातील काजिर्डा घाटाच्या माथ्यावर वसलेलं छोटसं गाव आहे. पडसाळी ते काजिर्डा या घाटाचे काम सध्या मनसेच्या माध्यमातून व लोकवर्गणीतून लोकांनी सुरू केले आहे. त्यामुळे पडसाळीसह अनेक गावांचा विकास होणार आहे.
पडसाळी ते काजिर्डा हे अवघ्या तीन ते चार किलोमीटरचे अंतर पश्चिम महाराष्ट्राला जोडले जाणार आहे. कारण कोल्हापूर, कळे, बाजारभोगाव, काळजवडे व पडसाळीसह अनेक गावांचा काजिर्डा घाटाशी थेट संपर्क जोडला जाणार आहे. या नव्या घाटामुळे अवघड वळणाचा घाट वाचणार आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण घटणार आहे. हा घाट झाल्यास गगनबावडा, भुईबावडा व अनुस्कुरा या घाटाला हा घाट हा सोयीस्कर ठरणार आहे. त्यामुळे एक ते दोन तासांचा प्रवास वाचणार आहे. रत्नागिरीतल्या राजापूरमध्ये अतिदुर्गम परिसरात काजिर्डा गाव वसलेले आहे.
मात्र, हा रस्ता करण्यासाठी १९७४ ते १९७७ पासून पडसाळी व काजिर्डा परिसरातील लोक धडपडत आहेत. मात्र, सरकारने याची दखल न घेतल्यामुळे पडसाळी व काजिर्डा परिसरातील लोकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी व तरुणांनी एकजुटीने हा घाट फोडण्यासाठी लोकवर्गणी करून श्रमदानातून व मनसेच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू केले आहे. काजिर्डा गावातून हा रस्ता थेट जातो; पण हा पन्हाळा तालुक्यातील पडसाळी गावातून बाजार भोगावमध्ये जात असून, हे अंतर केवळ वीस ते बावीस किलोमीटरचे ! हा रस्ता झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ६० ते ७० गावे थेट रत्नागिरीला जोडली जाणार आहेत.
१९७४ ते १९७७ या दरम्यान हा घाट रोजगार हमीच्या माध्यमातून फोडण्यात आला होता. मात्र, रस्ताच झाला नाही. त्यानंतर हे काम रखडले. त्यामुळे काजिर्डा व पडसाळी परिसरातील लोकांनी हा रस्ता पूर्ण करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. हा रस्ता झाल्यानंतर अनेक गरीब कुटुंबांच्या संसाराला हातभार लागणार आहे. हा रस्ता झाला तर कोल्हापूर ते बाजारभोगाव परिसरातील अनेक गावे विकासाच्या महामार्गावर येणार असून, शेतकरी वर्गाची शेतमालाची ने-आण करण्यासाठी हा घाट सोयीस्कर ठरणार आहे.
चौकट १) अपंग प्रकाशची चार किलोमीटर घाटातून सफर
ग्रामपंचायत काळजवडेमध्ये डेटा ऑपरेटर असणारे प्रकाश पाटील यांनी दगडधोंड्यातून पायी चालत काजिर्डा घाट उतरल्यानंतर काजिर्डाकरांनी अपंग प्रकाश यांना खांद्यावर उचलून जल्लोषपूर्ण स्वागत केले व शासनाचा जाहीर निषेध केला.
चौकट २)
काजिर्डा ग्रामपंचायतची सत्ता प्रथमत:च मनसे पक्षाची आल्यामुळे मनसे पक्षातील प्रमुख नेत्यांनी मशिनरी दिली आहे व आम्ही लोकवर्गणीतून हा घाट पूर्ण करून झोपलेल्या सरकारला जागे केल्याशिवाय मागे हटणार नाही आणि हा घाट पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.
अशोक आरडे सरपंच
ग्रामपंचायत काजिर्डा.
चौकट ३)
छत्रपती शाहू महाराजांनी पडसाळीच्या जंगलात त्या काळी मुढा गड नावाचा गड बांधला आहे. अजूनही त्या ठिकाणी त्याचे पुरावे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, शासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
प्रकाश पाटील .
चाफेवाडी
फोटो : पडसाळी काजिर्डा घाटाचे काम मनसेच्या सहकार्याने व लोकवर्गणीतून सुरू आहे.