आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि.१0 : व्यवस्थेने कल्याणकारी महामानवांना अनुल्लेखाने मारण्याचे काम केले आहे. इतिहासाचे संशोधन करून त्याची मांडणी करण्यासह ते ऐकलेही पाहिजे. प्रबोधनवाद्यांची सर्व बाजूंनी कोंडी केली जात आहे, असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी बुधवारी येथे केले. बुद्धपौर्णिमेनिमित्त प्रबोधन सेवाभावी संस्था आणि जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे आयोजित सातव्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरामधील या कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष डॉ. सुभाष देसाई, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे, आदी प्रमुख उपस्थित होते.
निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले, गौतम बुद्ध ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. बुद्धांचे तत्त्वज्ञान आजही वैचारिक धन देणारे आहे. खरा धर्म संतांनी शिकविला असून, संतवचनांतील ओळी आजही आपल्या मेंदूची स्वच्छता करतात.
ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे म्हणाले, धर्माचे नाव घेऊन लोक सत्तेत येताहेत. एका विशिष्ट विचारसरणीचा उदय होत आहे. धर्मनिरपेक्ष व समतावादी राज्य असण्याची गरज आहे. परंपरांच्या ओझ्याखाली आपण दबत आहोत. बुद्धिवादी लोकांची हत्या होत असून तो घातक प्रकार आहे.
कार्यक्रमात मीरासाहेब मगदूम यांना उत्कृष्ट प्रबोधन कार्यकर्ता, डॉ. सुभाष देसाई यांना उत्कृष्ट प्रबोधन साहित्यिक, तर प्रा. टी. आर. गुरव यांना उत्कृष्ट प्रबोधन वक्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनात डॉ. राजेंद्र कुंभार, टी. आर. गुरव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबूराव शिरसाट, बाळासाहेब गवाणी, संजय साळोखे, प्रा. अनिल घस्ते, सुजय पाटील, आदी उपस्थित होते. डॉ. जे. बी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र रत्नाबाई यांनी सूत्रसंचालन केले. विशाखा जितकर यांनी आभार मानले.
निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील म्हणाले,
भांडवलदार आणि धर्मांध शक्ती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तेथे सर्वसामान्यांचा विकास खुंटतो. सध्याचे सरकार नेमके हेच करीत आहे.
माणसांची विचार करण्याची प्रक्रिया थांबविण्याचा आजच्या सरकारचा घाट आहे.
संघपरिवार देशाला अस्थिर करण्याचे काम करीत आहे.
‘अच्छे दिन’चा आभास निर्माण करणाऱ्या मोदी सरकारविरोधात देशपातळीवर सर्वांनी एकत्र येण्याची गरज.
संमेलनातील ठराव
निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या लोकआंदोलनाबद्दल त्यांचे अभिनंदन व त्यांच्या विचारांना पाठिंबा.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुन्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि तपासात दिरंगाई करणाऱ्या सरकारचा निषेध.
देशातील सर्व धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण करावे. धर्माच्या नावावरच्या काळ्या पैशांचा विनियोग जनतेच्या विविध विकासकामांसाठी करावा.
पुरोगामी प्रबोधन साहित्य हे शासनाने ग्रंथालय संचालनालयातर्फे खरेदी करून त्याचे राज्यातील सर्व ग्रंथालयांना वितरण करावे.
‘जोतीराव फुले समग्र वाङ्मय’ हा ग्रंथ ५० रुपयांत उपलब्ध करून द्यावा.