लोकमत न्यूज नेटवर्कआंबा : कडवी नदी स्वच्छता अभियान अंतर्गत नदीपात्र सफाईसाठी रविवारी तळवडे ग्रामस्थांनी उठाव केला. शनिवारी रात्री ग्रामस्थांची बैठक घेऊन रविवारी दिवसभर गावच्या हद्दीतील पात्र ग्रामस्थांनी स्वच्छ केले. यावेळी गाळ काढण्यास ग्राममंदिराचे पुजारी जयराम पाटील यांनी जे.सी.बी.चे पूजन व श्रीफळ वाढवून प्रारंभ केला. शैलेश व तृप्ती गर्दे यांनी पणती प्रवाहित करून श्रमदानास प्रारंभ केला.यावेळी कोल्हापूरच्या प्रभाग मंडळाच्या भाजप अध्यक्षा सुषमा गर्दे म्हणाल्या, नदी जंगल परिसरातून वाहत असल्याने पात्र गवताचे केंदाळ व झुडपांनी व्यापले आहे. येथील मुबलक पडणाऱ्या पावसाचे पाणी पूर्वभागात पोहोचविण्यासाठी नदीपात्र जिवंत ठेवणे गरजेचे आहे. गावोगावचे शेतकरी एकत्र येऊन नदी पुनरुज्जीवनाचा राबवीत असलेला हा उपक्रम आदर्शवत आहे. नदी स्वच्छतेबरोबर पाण्याचे प्रदूषण होणार नाही यासाठी स्थानिक तरुणांनी जागृत व्हावे.यावेळी पोलीस पाटील गणेश शेलार, मुंबई मंडळाचे अध्यक्ष भरत हातणकर, तरुण मंडळाचे प्रमुख सुनील हातणकर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मारुती पाटील, मनोहर घावरे यांनी पुढाकार घेतला. शिराज शेख, केर्लेचे तंटामुक्त अध्यक्ष गणेश पाटील, धोंडिबा तवलके, अरविंद कल्याणकर, सरदार वरेकर यांच्यासह तरुण मंडळांचे कार्यकर्ते, सह्यागिरी महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे नदी स्वच्छतेला लोकसहभागाचा प्रतिसाद मिळत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिराज शेख यांनी स्पष्ट केले. यावेळी पाटबंधारे विभागाचे पर्यवेक्षक दिलीप गुरव व राजेंद्र लाड यांनी नदीचे महत्त्व विषद केले. देणाऱ्यांचे हात हजारोहुंबवली येथील मुंबईचे व्यावसाईक शशिकांत चव्हाण यांनी सहा हजार रुपयांची देणगी जाहीर केली, तर कोल्हापूरच्या गर्दे यांनी डिजिटलद्वारे जनजागृती फलक देण्याचे जाहीर करून पाच तासांचे भाडे देऊ केले. करंजोशीचे पाटबंधारे विभागाचे अभियंता पी. एम. बरसाळे यांनी दोन हजार पोहोच केले. गेले पंधरा दिवस लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहीम चालली आहे. आठखूरवाडी, केर्ले, तळवडे येथील नदीपात्रातील सुमारे दीड हजार फूट लांब व साठ फूट रुंद असा गाळ, गवत व केंदाळ काढण्यात आले. उद्या, मंगळवारी हुंबवली येथे ग्रामस्थ श्रमदान करणार असल्याचे शिवाजी पाटील यांनी जाहीर केले. यावेळी येथील के.टी.वेअरवर मद्यसेवनास बसलेल्या टोळक्याला ग्रामस्थांनी मज्जाव केला.
कडवी नदी स्वच्छतेसाठी तळवडे ग्रामस्थ सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2017 12:35 AM