कोल्हापूर : संगणक प्रणालीतील त्रुटींमुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइनपरीक्षा देता आली नाही. त्यामुळे विद्यापीठाने या विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा घ्यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आक्रमक झाली. या परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात आज, सोमवारी ठिय्या आंदोलन केले. विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालकांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही या आंदोलनकर्त्यांनी केली.विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात सकाळी अकराच्या सुमारास आंदोलनकर्ते विद्यार्थी पोहोचले. त्यांना सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी प्रवेशद्वारात थांबविले. त्यावर या आंदोलकांनी त्या ठिकाणी ठिय्या मारत मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा देत परिसर दणाणून सोडला.दरम्यान संगणक प्रणालीतील या त्रुटींमुळे आणि त्याकडे विद्यापीठ प्रशासन आणि परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक यांनी केलेल्या दुर्लक्षाचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रभावीपणे अभाविपने पुनर्परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. परीक्षेतील तांत्रिक अडचणी कडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रभारी परीक्षा संचालकांचा राजीनामा घेवून विद्यापीठ प्रशासनाने त्यांची हकालपट्टी करावी, अशी आमची मागणी आहे.त्याबाबतचे निवेदन विद्यापीठ प्रशासनाला दिले आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असल्याचे विशाल जोशी यांनी सांगितले.या आंदोलनात विशाल जोशी, अमोल कुलकर्णी, दिनेश हुमनाबादे, गौरव ससे, मेघा शिरगावे, सानिका पाटील, आदी सहभागी झाले.
exam: पुनर्परीक्षा घ्या, शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर 'अभाविप'चे ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 12:00 PM