कोल्हापूर : बांधकाम व्यावसायीकांची अडवणूक करुन खंडणी मागणाºया काही नगरसेवकांसह माहिती अधिकारी कार्यकर्त्यांची चौकशी करुन त्यांचेवर थेट गुन्हे दाखल करावे, अशी मागणी क्रिडाईच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचेकडे शुक्रवारी करण्यात आली. त्यावर नांगरे-पाटील यांनी बांधकाम व्यावसायीकांना विनाकारण त्रास देणाºयांची चौकशी करुन दोषी आढळलेस थेट कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिले. क्रिडाईच्या वतीने नांगरे-पाटील यांना निवेदन देण्यात आले.
बांधकाम व्यावसायिक सुनील गेंजगे यांच्या आत्महत्येप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी नगरसेविका भाग्यश्री शेटके यांचा पती संशयित उदय वसंतराव शेटके, त्याचा भाऊ उमेश शेटके, उत्तम शेटके, तसेच चालक शैलेश ऊर्फ सूर्यकांत पोवार यांना अटक केली आहे. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. साडेचार कोटी रुपयांसाठी संशयितांनी गेंजगे यांच्याकडे तगादा लावला होता. या तणावातून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेच्या पार्श्वभूमिवर क्रिडाईच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांची भेट घेवून निवेदन दिले. त्यांनी बांधकाम व्यवसायामध्ये अडचणी वाढत आहेत.
जागेच्या वाढत्या किंमती, बदलणारे कायदे, बँकासह पतपुरवठा करणाºयांनी फिरवलेली पाठ, बाजारातील मंदी, वाढलेल्या वस्तुंच्या किंमतीमुळे बांधकाम व्यावसायीक मेटाकुटीला आला आहे. शासकीय कार्यालयात विशेषत: महानगरपालिका नगररचना विभागामार्फत बांधकाम परवानगी देण्यासाठी केली जाणारी अडवणूक आणि माहिती अधिकारातील व्हाईट कॉलर खंडणीची मागणी करीत असतात.
बांधकाम प्रस्ताव महापालिकेत सादर केलेनंतर त्याची माहिती संबधीत वॉर्डातील नगरसेवक आणि माहिती अधिकारी कार्यकर्त्यांना मिळते. त्यानंतर अडवणूकीचे सत्र सुरु होते. संबधितांशी शंका निरसन करण्यास नगररचा विभागातील अधिकारीच सांगतात. माहिती अधिकाराचा गैरवापर केला जात आहे. काही नगरसेवक बांधकाम व्यावसायीकास दमदाटी करुन पैशाची मागणी करतात. गेंजगे यांची आत्महत्या अशा दबावामुळेच झाली आहे.
या प्रकरणातील दोषींवर तसेच इतर बांधकाम व्यावसायीकांना वेठीस धरणाºयांवर नगरसेवक आणि आर. टी. आय कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी. यावेळी क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव, विद्यानंद बेडेकर, के. पी. खोत, सचिन ओसवाल, शंकर गावडे आदींसह बांधकाम व्यावसायीक उपस्थित होते.