गारगोटी : भुदरगड पोलीस ठाण्यातील भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बुधवारी पोलीस ठाण्यावरच मोर्चा काढण्यात आला. मोर्चामधील कार्यकर्त्यांनी नूतन पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासमोर अवैध दारू व्यावासायिक यांच्याकडून पाेलीस किती हप्ते घेतात याचा पाढाच वाचला. सर्वंसमोर आरोप-प्रत्यारोप करीत भुदरगड पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराचे शिवसेनेने धिंडवडे काढले. तांबाळे (ता. भुदरगड) येथे बुधवार (दि. १०) भुदरगड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी गावठी दारूविक्रेते बाजेल भुतलो यांच्यावर कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी केली. भुतेलो यांनी पोलिसांनी महिन्याचा ठरविलेला हप्ता पोलिसांचे पंटर असिफ काझी यांच्याकडे दिला होता. गावात अनेक लोक अवैधरीत्या दारू विक्री करतात. तरीही माझ्यावर वैयक्तिक कारवाई करण्यात आल्याचा आरोप भुतेलो यांनी पोलीस निरीक्षक मोरे यांच्यासमोरच केला.
अजूनही भुदरगड तालुक्यात अवैध धंदे सुरू असून ही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. मग इतरांवर का अन्याय होत आहे? पोलीस पंटर काझी याचे मोबाईल रेकाॅर्ड तपासून त्याला तत्काळ अटक करावी, जे पोलीस कर्मचारी हप्ते घेतात, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तालुकाप्रमुख अविनाश शिंदे यांनी केली.
यावेळी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी संबधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात येईल. तालुक्यातील सर्व अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही मोरे यांनी दिला आहे. यावेळी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य प्राचार्य अर्जुन आबिटकर, ग्रामपंचायत सदस्य रणधीर शिंदे, संग्रामसिंह सावंत, थाॅमस डिसोझा, सुशांत सूर्यवंशी, वसंत देसाई, अरुण शिंदे, उपसभापती सुनील निंबाळकर उपस्थित होते.
फोटो: १) भ्रष्टाचारी पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने भुदरगड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अर्जुन आबिटकर, प्रकाश पाटील, अविनाश शिंदे, संग्रामसिंह सावंत उपस्थित होते.