इचलकरंजी : पूरग्रस्त नागरिकांना अरेरावी व अवमानास्पद वागणूक देणाऱ्या मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.
निवेदनात, महापुरामुळे शेतकरी, व्यापारी व उद्योजकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशाप्रसंगी पूरग्रस्त नागरिकांचा घरफाळा व पाणीपट्टी माफ व्हावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुख्याधिकारी ठेंगल यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरून संघटनेच्या कार्यकर्त्यांना दालनातून बाहेर काढले. अशा कठीणप्रसंगी सहानुभूती दाखविण्याऐवजी नागरिकांना मज्जाव करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे म्हटले आहे. दरम्यान, कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे संघटनेने सांगितले.
या शिष्टमंडळात स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सौरभ शेट्टी, बसगोंडा बिरादार, अण्णासाहेब शहापुरे, सतीश मगदुम, हेमंत वणकुंद्रे, अरिहंत कुपवाडे, अभिषेक पाटील, आदींचा समावेश होता.