कोल्हापूर : रुईकर कॉलनीतील जय भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांनी मद्यधुंद अवस्थेत डॉ. श्रीधर सावंत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व धक्काबुक्की करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याविरोधात शनिवारी सर्व शिक्षक आणि नागरी संघटना कृती समितीच्या वतीने संस्थेच्या समोर मूक धरणे आंदोलन केले.संस्थाचालक जाधव हे शिक्षकांच्या पगारातून दरमहा एक दिवसाचा पगार कपात करणे, वरिष्ठ निवड, वेतन श्रेणी न देणे,, वेतन आयोगातील संपूर्ण फरक शिक्षकांच्या कडून काढून घेणे, शिक्षकांकडून घरची साफसफाई, स्वतःच्या पाहुण्यांची बडदास्त ठेवणे, महिला शिक्षकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, महिलांना टोमणे मारणे ,किरकोळ रजा, प्रसूती रजा न देणे, दिल्यास त्या दिवसाचा पगार शिक्षकांकडून रोख स्वरूपात काढून घेणे, असा प्रकार करतात. असा आरोप महिला शिक्षकांनी केला आहे. याविरोधात आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समिती जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेवर मूक मोर्चा काढण्यात आला.या आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठाचे एस.डी .लाड, वसंतराव देशमुख,अशोक पोवार, रमेश मोरे, खाजगी शिक्षक संघटनेचे भरत रसाळे, संतोष आयरे, राजेंद्र कोरे,एम.डी.पाटील, आनंद हिरुगडे, अनिल सरक ,टी .आर .पाटील आदि शेकडो शिक्षक सहभागी झाले होते.दरम्यान शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी संस्थेला भेट दिली. शिक्षकांचा संताप पाहून त्यांनी देखील संस्थाचालकांची कान उघडणी केली. मात्र, संस्थाचालकांनी जवळपास तासभर आमदारांना गेटवर ताटकळत ठेवले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
असा कोणताही प्रकार आमच्या शिक्षण संस्थेमध्ये घडला नाही. शिक्षण उपसंचालकांनी येऊन चौकशी करावी. जर चुकीचे घडले असेल तर ते कारवाई करावी- सुमित्रा जाधव ,संस्था पदाधिकारी