दिंडनेर्ली : दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथील विठ्ठल पाणीपुरवठा सहकारी संस्थेच्या फेरलेखापरीक्षणामध्ये ६४ लाख ६० हजार ४११ रुपये इतका अपहार झाल्याचे संबंधित तपासणी अधिकारी यांनी नमूद करून अहवाल सादर केलेला असताना, सहकार खात्याने कोणतीच कारवाई केली नाही. उलट संस्थेचे तत्कालीन संचालक मंडळ, सचिव यांना वाचविण्यासाठी अपहार झालेल्या रकमेमध्ये फेरफार करून ६४ लाखांचा अपहार असताना तो २ लाख ५२ हजार रुपये दाखविला आहे. त्यामुळे या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करून अपहारामध्ये दोषी असणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करा, अन्यथा संचालक मंडळ सहकार आयुक्त कार्यालयात आत्मदहन करेल, असा इशारा संस्थेचे चेअरमन रमेश चव्हाण व संचालक मंडळाने दिला.
यावेळी रमेश चव्हाण म्हणाले की, सन २०१०-११ ते सन २०१४ - १५ या आर्थिक वर्षामध्ये तत्कालीन संचालक मंडळाने बेकायदेशीर व्यवहार केल्याचे सन २०१६ मध्ये आमच्या निदर्शनास आले. त्यामुळे आम्ही सहकार खात्याकडे संस्थेचे फेरलेखापरीक्षण करण्याची मागणी केली. त्याप्रमाणे विशेष लेखापरीक्षक सतिश पाडळकर यांनी संस्थेची दप्तर तपासणी केली त्या तपासणीमध्ये त्यांनी तत्कालीन संचालक मंडळ आणि सचिव यांनी संगनमताने बेकायदेशीररित्या तब्बल 64 लाख 60 हजार 4 11 इतक्या रकमेचा अपहार झाल्याचे अहवालामध्ये नमूद केले आहे. एवढा मोठा अपहार होऊनसुद्धा सहकार खात्याने तत्कालीन चेअरमन आणासोा बोडके, सचिव नाना बेनके व संचालक मंडळ व प्रमाणित लेखापरीक्षक के. एस. मगदूम, मनोज मुल्ला यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. सहकार खात्याने अपहारात दोषी असणाऱ्या संचालक मंडळ व प्रमाणित लेखापरीक्षक यांच्यावर १० एप्रिलपूर्वी कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा सहकार आयुक्तांच्या कार्यालयात आमरण उपोषण तसेच प्रसंगी आत्मदहन करणार असल्याचा इशारा चव्हाण यांनी दिला.