कोल्हापूर : गंगावेश ते शिवाजी पूल येथील रस्त्याची पाहणी करून रस्ता करण्याचे आदेश देऊनही कार्यवाही होत नाही. या कामात टोलवाटोलवी करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी गुरुवारी आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली. गंगावेश शिवाजी पूल रस्त्याच्या कामासाठी वेळोवेळी आंदोलन केले आहे. गंगावेश ते शुक्रवार गेट मार्गावरील ड्रेनेज व रस्त्याचे काम पूर्ण असून आपण स्वतः या संदर्भात पाहणी करून अधिकाऱ्यांना त्वरित काम करण्याच्या सूचना देऊनही आजपर्यंत कोणतीही कार्यवाही दिसत नाही. या कामात अडचण येऊ नये म्हणून समितीच्या वतीने पोलीस प्रशासनाकडून येथील एकेरी मार्ग करणे व अवजड वाहनांना प्रवेशबंदीची मागणी केली. याला पोलीस प्रशासनाने त्वरित प्रतिसाद देऊन गेले २० दिवस त्याची अंमलबजावणी सुरू आहे. परंतु महापालिकेतील अधिकारी हे गांभीर्यपूर्वक न घेता कामात टोलवाटोलवी करत आहेत. यावेळी महेश कामत, सुरेश कदम, रियाज बागवान, आर. एन. जाधव, अनंत पाटील, रोहन जाधव, आदी उपस्थित होते.
चौकट
... अन्यथा कासव छाप म्हणून सत्कार
रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावीत. काँक्रीट रोडचा प्रस्ताव शासनाकडून त्वरित मंजूर करून घ्यावा अन्यथा जनतेच्या वतीने अधिकाऱ्यांचा ‘कासव छाप अधिकारी’ म्हणून गंगावेश चौकात जाहीर सत्कार करण्यात येईल, असा इशारा संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी दिला. यावेळी प्रशासक डॉ. बलकवडे यांनी त्वरित कारवाई करून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
फाेटो : ०७०१२०२० कोल केएमसी रस्ता निवदेन
ओळी : कोल्हापुरात गंगावेश ते शिवाजी पूल येथील रस्ता करण्यास कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी चालढकलपणा करत असल्याबाबत आखरी रस्ता कृती समितीच्या वतीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन दिले.