यड्राव : येथील कन्या विद्यामंदिरमध्ये केजीएन महिला बचत गटाचा पोषण आहाराचा ठेका शालेय व्यवस्थापन समितीने रद्द केला आहे. या रागातून ग्रामशिक्षण समिती व शिक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करून मानसिक त्रास देण्याचा प्रकार बचत गटाच्या अफसाना देसाई यांच्याकडून झाला आहे. संबंधित महिलेवर कायदेशीर कारवाई करून शाळेची व गावची बदनामी थांबवावी याविषयीचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व पोलीस उपअधीक्षक यांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. यावेळी त्यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले आहे.
कन्या विद्यामंदिरला केजीएन बचत गटाच्यावतीने पोषण आहार पुरवठा होत होता. यामध्ये होणाऱ्या तक्रारींबाबत शिक्षण समितीने सूचना देऊनही बदल झाला नसल्याने त्यांच्या वागणुकीत बदल झाला नाही. यामुळे समितीने रितसर अर्ज मागवून दुसऱ्या गटाला ठेका दिला. शिक्षक व समितीमधील सदस्यांवर रागातून अफसाना देसाई यांनी अदखलपात्र, व दखलपात्र तक्रारी शहापूर पोलीस ठाण्यात दिले आहेत. या महिलेवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांना देण्यात आले.
शिष्टमंडळात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर, सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर, सरदार सुतार, उषा तासगावे, सुमन झुटाळ, शिवाजी दळवी, केशव धुमाळे, अभिजित उपाध्ये, रंगराव कांबळे, औरंग शेख, महेश निर्मळ, दीपक झुटाळ सहभागी होते.
फोटो - १०१२२०२०-जेएवाय-०४
फोटो ओळी - खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अफसाना देसाई यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आले.