कोल्हापूर : परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरूच ठेवावे. अपघाताचे वाढते प्रमाण कसे कमी करता येईल यावर भर द्यावा, शहरात रहदारीस अडथळे ठरतील अशा अतिक्रमणधारकांवर महापालिका प्रशासनाच्या मदतीने कारवाई करा, अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सोमवारी पाचही जिल्ह्यांच्या वाहतूक निरीक्षकांना दिल्या.
वाहतूक नियोजन आढावा बैठक विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात सोमवारी सकाळी अकरा ते दोन यावेळी घेण्यात आली. यावेळी पोलिसांनी गेल्या आठ महिन्यांत वाहतुकीचे नियोजन काय केले आहे, वाहनांवर केलेली कारवाई, वाहनांचा सर्व्हे आणि उपाययोजना यासंबंधीचा आढावा नांगरे-पाटील यांनी घेतला. बैठकीस पाचही जिल्ह्यांच्या अप्पर पोलीस अधीक्षकांसह वाहतूक निरीक्षक उपस्थित होते. यावेळी नांगरे-पाटील म्हणाले, पाचही शहरांत वाहनांची संख्या वाढल्याने शहरासह उपनगरांत वाहतुकीची कोंडी होत आहे.
काही वाहनधारक नियमबाह्य वाहने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याचे दिसते. निष्काळजीपणे वाहन चालविल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. बेशिस्तपणे लोक रस्त्यावर वाहने चालवित असतात. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत असते.
परवाना नसणे, फिल्मिंग काचा, झेब्रा क्रॉसिंग, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, ट्रीपल सीट, फॅशनेबल नंबरप्लेट, मोबाईलवर बोलत वाहन चालविण्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पाचही जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेशी संवाद साधा, बैठका घेऊन त्यांच्याकडून वाहतूक नियोजनासाठी काही मदत किंवा सुविधा घेता येते का, त्यासाठी प्रयत्न करा. शहरात रस्त्यावर, फुटपाथवर फेरीवाले, हातगाड्यांवरील खाद्य विक्रेत्यांमुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. अशा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून सर्व खटले न्यायालयात दाखल करा, अशा सूचनाही नांगरे-पाटील यांनी दिल्या.