कोल्हापूर : पावसाळा तोंडावर आल्याने शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई करावी, किती इमारतींवर कारवाई केली, किती इमारती उतरवल्या, स्ट्रक्चरल ऑडिट किती इमारतींचे केले, किती इमारती दुरुस्त केल्या, यासंबंधीची सविस्तर माहिती दोन दिवसांत देण्याच्या सूचना महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पाऊस आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
प्रशासक डॉ. बलकवडे म्हणाल्या, पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना कोरोनासंबंधीचे नियम पाळून स्थलांतरित करण्याचे नियोजन करावे. त्यांच्यासाठी आताच आणखीन शाळा किंवा हॉल बघून ठेवावे. उद्यान व विद्युत विभागाने शहरातील धोकादायक झाडे, पोल पावसापूर्वी उतरवून घेण्याची कार्यवाही करावी. महापूर आल्यास बाधित क्षेत्रातील वाहने पार्किंग करण्यासाठी आणि जनावरे ठेवण्यासाठी विभागीय कार्यालयांनी आपल्या क्षेत्रातील ओपन स्पेस आरक्षित करावे. ज्याठिकाणी नाले सफाई झालेली आहे, अशा ठिकाणी पहिल्या मोठ्या पावसाने पुन्हा गाळ भरला असेल तर त्याठिकाणी पुन्हा चॅनेल साफ करून घ्यावे.
शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत म्हणाले, विभागीय कार्यालय एक ते चारमध्ये १७० धोकादायक इमारती आहेत. त्या इमारत मालकांना नोटिसा लागू करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. यापैकी ५० इमारती पाडण्यात आल्या आहेत. आठ इमारती दुरुस्त केल्या आहेत. २७ इमारतीसंबंधी न्यायालयात वाद सुरू आहेत. कुळमालकाचा वाद असलेल्या व उतरविणे प्रलंबित असलेल्या ८५ इमारती आहेत.
मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले म्हणाले, महापालिका कार्यक्षेत्रात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. त्याचबरोबर शहर आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी आपत्ती व्यवस्थापनेचा आराखडा सादर केला. यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहा. आयुक्त चेतन कोंडे, संदीप घार्गे, जल अभियंता अजय साळोंखे, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, प्रशासन अधिकारी शंकर यादव, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, कनिष्ठ अभियंता मीरा नगिमे आदी उपस्थित होते.
फोटो: ०८०६२०२१-कोल- केएमसी बैठक
कोल्हापुरातील महापालिकेच्या बैठकीत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी विविध सूचना दिल्या. यावेळी अधिकारी उपस्थित होते.