कोल्हापूर : चालू कर्जाची जूनअखेर परतफेड करून प्रोत्साहनपर अनुदानाचा तर थकबाकीदार शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील रक्कम भरावी व कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले.महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील ३० लाख १२ हजार शेतकऱ्यांना १२ हजार कोटीची कर्जमाफी दिली. काही गावात सार्वजनिक निवडणुकांमुळे कर्जमाफीची रक्कम जमा करता आली नाही. अशा ११ लाख १२ हजार शेतकऱ्यांना आठ हजार १०० कोटी रुपये अद्याप द्यावयाचे आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे राज्याचे आर्थिक स्रोत थांबले आहे. रिझर्व बँकेचे प्रमुख शक्तीकांत दास यांनी देशाचा विकासाचा दर शून्य टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे. तरीही कर्जमाफीत पात्र आहेत मात्र त्यांना लाभ मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा करावा, त्याची थकहमी सरकारने घेतली आहे. त्याचबरोबर २००९ च्या केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र शेतकऱ्यांसाठीही कर्ज देण्याबाबत धोरण जाहीर केले होते, मात्र शेतकऱ्यांना कर्ज नको माफीच हवी आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून त्याचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागेल, अशी आशा आहे.नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान तर दोख लाखावरील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. नियमित परतफेड करणाऱ्यांनी जून २०२० पर्यंत परतफेड केली तरच प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. थकीत दोन लाखांवरील कर्ज भरणाऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी, तर नियमित परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यास शासन बांधील असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.