कोल्हापूर : सांगलीसह कोल्हापूर परिसरातील व्यावसायिकांनी आधुनिकतेची कास धरत नवीन साधनांचा वापर संदर्भातील कौशल्य वाढविण्यासाठी करावा. यासह जीएसटी अभय योजनेबरोबरच इतर विभागांच्या प्रोत्साहन योजनांचा लाभ घ्यावा, असे मत
केंद्रीय जीएसटीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांनी व्यक्त केले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे कोल्हापुरी दागिने व कोल्हापुरी चप्पल व्यवसाय वृद्धीसाठी कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.
मेढेकर म्हणाले की, जीएसटी अभय योजनेत जुलै २०१७ ते एप्रिल २०२१ या
कालावधीतील जीएसटी रिटर्न- ३ बी प्रलंबित असतील तर हे रिटर्न-३ बी योजनेच्या मुदतीत भरल्यास एक हजार रुपये प्रति रिटर्न हे
सवलतीचे विलंब शुल्क भरावे लागेल. तर या काळातील निल जीएसटी रिटर्न- ३ बी भरल्यास ५०० रुपये प्रति रिटर्न हे
सवलतीचे विलंब शुल्क भरावे लागतील, अशी माहिती दिली. यावेळी त्यांनी जीएसटी अभय योजनेसह दागिने व चप्पल व्यवसायसंबंधी जीएसटी तरतुदींची तपशीलवार
माहिती देत प्रोत्साहनपर सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
हस्तकला विभाग कोल्हापूरचे सहायक संचालक चंद्रशेखरसिंग म्हणाले की, हस्तकला टिकवून ठेवली आहे. येथील उत्पादने स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकण्यासाठी नवतंत्रज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे. जीआय मानांकनासाठी हा विभाग प्रयत्न करीत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मिटकाॅनचे जगन्नाथ माळी, श्रीधर वैद्य,संदीप पोवार, अजय चितारी, राजेशकुमार, उदय जोशी, राजन गोंदकर यांनी योगदान दिले. करवीर हॅण्डीक्राफ्ट प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष अमरसिंह बागल, अपर्णा चव्हाण, अतिश चव्हाण यांच्या सहकार्यानेही कार्यशाळेचे संयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस कोल्हापूर, सांगलीतील दागिने व चप्पल व्यावसायिक उपस्थित होते.
फोटो : ०२०९२०२१-कोल-जीएसटी
आेळी : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे कोल्हापुरी दागिने व कोल्हापुरी चप्पल व्यवसाय वृद्धीसाठी कोल्हापुरात आयोजित कार्यशाळेत केंद्रीय जीएसटीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांनी मार्गदर्शन केले.