आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ९ : खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत, अशी मागणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठानने मंगळवारी येथे केली. या मागणीचे निवेदन प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.
छत्रपती शिवराय यांचे थेट १३ वे वंशज असणारे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे सर्वसामान्य मराठा समाजाचे नेतृत्व आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. लोणंद येथील सोनी अलायन्स कंपनीतील कामगारांना न्याय मिळावा म्हणून खासदार उदयनराजे भोसले प्रयत्न करीत होते.
याबाबत चर्चेची प्रक्रिया सुरू असताना या कंपनीच्या मालकांशी संधान साधून खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला भाग पाडले. शिवाय गैरसमजाचे वातावरण निर्माण केले आहे. प्रशासनाने याबाबत योग्य ती चौकशी करुन खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरीत मागे घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी प्रतिष्ठानने या निवेदनाद्वारे केली आहे. यावर संबंधित मागणीची दखल घेतले जाईल, असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिले.
शिष्टमंडळात सत्यजित घोरपडे, मयुरेश भोसले, शैलेश जाधव, सुहास भोसले, अविनाश जुगदार, अरुण हिरेमठ, अनिकेत जाधव, सूरज मुल्ला, अभिजित भोसले, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)