कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडाच्या तपास प्रकरणी नेमण्यात आलेले एस.आय.टी.प्रमुख व त्यांचे कार्यालय कोल्हापुरात असावे, जेणेकरून या प्रकरणाचा तपास शीघ्रगतीने होईल; या मागणीसह खुनातील आरोपींवर देशद्रोहाचाही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. पानसरे यांच्या हत्याकांडातील गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र व वाहने पोलीस कधी ताब्यात घेणार आहेत; याशिवाय गुन्ह्याचा तपास लवकर होण्यासाठी एस.आय.टी.च्या प्रमुखांचे मुख्यालय कोल्हापुरात करावे. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक होईपर्यंत व तपास पूर्ण होईपर्यंत एस.आय.टी.च्या पथकाने येथेच थांबावे. शहीद गोविंद पानसरे हे स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक होते. त्यामुळे त्यांच्या खुनातील आरोपींवर देशद्रोहाचे कलमही लावावे. या खुनातील संशयित म्हणून पकडण्यात आलेला समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक/हस्तक असल्याचे सिद्ध झाले आहे. यापूर्वीही संस्थेच्या हस्तकांनी व अनुयायांनी बॉम्बस्फोटासारख्या गंभीर व अतिरेकी अनेक कारवाया केल्या आहेत. यासह या खटल्यात तांत्रिक चूक राहू नये, याकरिताही निष्णात वकिलांची मदत घेऊन पुरवणी दोषारोपपत्र दाखल करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदन दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अशा प्रकारे चूक आम्ही दोषारोपपत्रात ठेवणार नाही. याशिवाय माझी टीम बोलण्यापेक्षा काम करण्यावर अधिक भर देणार आहे. त्यामुळे आमचे काम यापुढे तुम्हाला दिसेलच, अशी ग्वाही दिली. यावेळी सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, बी. एल. बरगे, आशा बरगे, दिलदार मुजावर, दिनकर सूर्यवंशी, रियाज शेख, प्रा. आशा कुकडे, नामदेव पाटील, महादेव आवटे, सिद्धार्थ कांबळे, अजित विचारे, मधुकर माने, अतुल कवाळे, गणेश बुचडे, रूपाली कदम, प्रशांत अंबी, समाधान ठोणगे, मोनेश सुतार, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
‘एस.आय.टी’.चा तळ कोल्हापुरात करा
By admin | Published: December 17, 2015 1:00 AM