सावरवाडी : कसबा बीड (ता. करवीर) गावच्या महालक्ष्मी तलावातील साचलेला गाळ लोकसहभागातून काढण्याचा उपक्रम ग्रामस्थांनी सामुदायिक ऐक्यातून राबविला. गाळ काढल्याने महालक्ष्मी तलावाने तब्बल ५० वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला. गावच्या वायव्य दिशेला असलेल्या महालक्ष्मी सार्वजनिक प्राचीन तलावात गेली पाच दशके गाळ साचलेला होता. गाळामुळे तलावातील पाणी दूषित बनले होते. तलावाच्या सभोवार पानवनस्पती, केंदाळ प्रचंड स्वरूपात वाढलेली होती. दूषित पाण्यामुळे तलावातील मासे दरवर्षी मृत्युमुखी पडत होते. तलावाच्या परिसरात विषारी सापांचे वास्तव्य होते. तलावातील कुजलेल्या दूषित पाण्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण बनले होते. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने करवीर पंचायत समितीच्या माध्यमातून लोकसहभागातून सुमारे चार हजार ट्राली गाळ काढण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी या गाळाचा शेतीमध्ये खत म्हणून वापर केला आहे. सलग उपक्रम ग्रामपंचयतीने राबविल्याने महालक्ष्मी सार्वजनिक तलावातील गाळ काढण्यात आला. महालक्ष्मी ऐतिहासिक तलाव परिसरात वैभव उभे करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे. तलावाच्या सभोवार दगडी संरक्षण भिंत, कुंपण उभारण्यात येणार आहे. पावसाळा ऋतूमध्ये पाणी साठवण करून ग्रामपंचायतीतर्फे मच्छ व्यवसाय उभारण्यात येणार आहे. चार हजार ट्राली गाळ या तलावातून काढल्याने हा परिसर रम्य ठिकाण बनू लागले आहे. या तलावाजवळ अकराव्या शतकातील महालक्ष्मी मंदिर आहे.लोकसहभागातून विकासाचे नवे पर्व उभारले जाते. ५० वर्षांतील साचलेला गाळ काढल्यामुळे कसबा बीड गावाला नवे वैभव प्राप्त झाले आहे. सरंक्षण भिंतीसाठी राज्य शासनाने अनुदान देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावचे ऐक्य आणि लोकसहभाग यामुळे हा उपक्रम राबविला आहे. - राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती सदस्य
महालक्ष्मी तलावाने घेतला मोकळा श्वास
By admin | Published: June 08, 2015 9:34 PM